नाशिकमध्ये खड्ड्यांचा कहर! वृत्तपत्र विक्रेत्याच्या डोक्याला ९ टाके, हात फ्रॅक्चर; नागरिकांचा संताप
नाशिक : शहरातील रस्त्यांवरील खड्डे, चिखल आणि अपूर्ण खोदकामामुळे नागरिकांचे जीव धोक्यात येत असल्याचे पुन्हा
एकदा समोर आले आहे. अपघातांमुळे अनेकांना गंभीर दुखापती होत असून आर्थिक फटकाही
बसत आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने रस्त्यांची दुरुस्ती
करण्याची मागणी केली आहे. वृत्तपत्र विक्रेते संजय बोराडे यांनी सांगितले
की, वडाळा नाका परिसरात रस्त्यावर साचलेल्या चिखलामुळे आणि
मोठ्या खड्ड्यामुळे त्यांचा तोल गेला. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत
होऊन ९ टाके घालावे लागले, हाताला फ्रॅक्चर झाले तसेच
पायाला प्लास्टर करावे लागले. त्यांना पाच दिवस रुग्णालयात उपचार घ्यावे लागले,
तर त्यानंतर १२ दिवस विश्रांती घ्यावी लागली. रोजंदारीवर काम करत
असल्याने या काळात आर्थिक नुकसानही झाले. दुसरीकडे, अतुल
कुलकर्णी यांची कार द्वारका सर्व्हिस रोडवरील चिखल आणि
खड्ड्यांमुळे अडकली. कार बाहेर काढण्यासाठी क्रेन बोलवावी लागली, ज्यासाठी सुमारे १,५०० रुपये खर्च आला. वाहनाचे नुकसान झाले असून दुरुस्तीसाठी ७,५०० ते १०,००० रुपये खर्च
अपेक्षित आहे. कार बाहेर काढण्याच्या प्रयत्नात त्यांच्या उजव्या गुडघ्यालाही
गंभीर दुखापत झाली.
महेश दुसाने, बँकेत सुवर्णपरीक्षक म्हणून कार्यरत
असलेले नागरिक, यांनाही रस्त्यातील खड्ड्यामुळे दुचाकी अपघात
झाला. त्यांच्या उजव्या पायाच्या घोट्याचे हाड मोडले असून शस्त्रक्रिया, औषधोपचार आणि इतर उपचारांसाठी जवळपास २ लाख रुपये खर्च आला.
डॉक्टरांनी त्यांना किमान तीन महिने विश्रांतीचा सल्ला दिल्याने त्यांचे उत्पन्नही
बंद झाले आहे. नागरिकांनी रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवून सुरक्षित वाहतुकीची
व्यवस्था करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. निष्काळजीपणामुळे होणाऱ्या
अपघातांना आळा घालण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.