रूपा भवानी येथील वाल्मिकी समाज मंदिराची प्रथमेश कोठे यांनी केली पाहणी; अपूर्ण कामे लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन

सोलापूर : रूपा भवानी येथील वाल्मिकी समाज मंदिराची नगरसेवक प्रथमेश कोठे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून अपूर्ण कामांचा आढावा घेतला. समाजातील प्रमुख मान्यवर, संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या उपस्थितीत कामांच्या प्रगतीबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी प्रथमेश कोठे यांनी सांगितले की, दिवंगत महेश अण्णा कोठे यांनी सोलापूरातील विविध समाजांच्या समाजमंदिरांसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नातून तत्कालीन उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या माध्यमातून अनेक समाजमंदिरांसाठी निधी उपलब्ध झाला आणि विविध समाजांची स्वप्ने पूर्ण झाली. मात्र, वाल्मिकी समाज मंदिराची काही कामे अद्याप अपूर्ण राहिली असून ती पूर्ण करणे हे आपले कर्तव्य असल्याचे प्रथमेश कोठे यांनी नमूद केले. ही केवळ विकासकामाची बाब नसून दिवंगत महेश अण्णा कोठे यांच्या अपूर्ण संकल्पाची पूर्तता असल्याचे त्यांनी सांगितले. वाल्मिकी समाज मंदिराची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विशेष निधीतून आवश्यक आर्थिक तरतूद मिळावी यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

पाहणीदरम्यान अपूर्ण कामे दर्जेदार पद्धतीने आणि शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकारी व कंत्राटदारांना सूचना देण्यात आल्या. तसेच वाल्मिकी समाजाच्या भावना आणि अपेक्षांचा आदर राखत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, असे आश्वासन प्रथमेश कोठे यांनी दिले.