चाकोते नगर परिसरातील समस्यांची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी; नगरसेवक प्रथमेश कोठेंकडून तातडीच्या उपाययोजनांचे आश्वासन
सोलापूर : 'आपला दरबार' उपक्रमामध्ये नागरिकांनी मांडलेल्या विविध नागरी समस्यांची दखल घेत नगरसेवक प्रथमेश कोठे यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह चाकोते नगर, ब्रह्मनाथ नगर आणि पिठ्ठा नगर परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान परिसरातील रस्त्यांची अवस्था, पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज व्यवस्था तसेच इतर मूलभूत नागरी सुविधांचा आढावा घेण्यात आला. नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि मागण्या जाणून घेण्यात आल्या.
यावेळी नागरिकांनी मांडलेल्या समस्यांची संबंधित अधिकाऱ्यांनी नोंद घेत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. तसेच विविध विभागांच्या समन्वयातून प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. नगरसेवक प्रथमेश कोठे यांनी नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, असे आश्वासन दिले. या पाहणीवेळी परिसरातील नागरिक, महानगरपालिकेचे अधिकारी तसेच सहकारी नगरसेवक उपस्थित होते.