माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली

कोल्हापूर : ज्येष्ठ शिक्षणमहर्षी, माजी राज्यपाल आणि पद्मश्री सन्मानाने गौरविण्यात आलेले डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनानंतर देशभरातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. आज कोल्हापूर येथील कसबा बावडा परिसरातील यशवंत निवासस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यानंतर पॅव्हेलियन मैदानावर शासकीय इतमामात पार पडलेल्या अंत्यसंस्कारालाही सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहिले. यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सातलिंग शटगार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय नेते, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रद्धांजली अर्पण करताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, "शैक्षणिक क्षेत्रातील दूरदृष्टी असलेले एक मोठे नेतृत्व आज आपल्यातून निघून गेले आहे. ज्ञानेश्वर अर्थात डॉ. डी. वाय. पाटील यांनी महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक आणि अभूतपूर्व कार्य केले. अनेक महाविद्यालये, शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांची उभारणी करून त्यांनी लाखो विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली केली." ते पुढे म्हणाले की, शिक्षण, आरोग्य, शेती आणि सामाजिक विकास या क्षेत्रांचा त्यांनी सातत्याने ध्यास घेतला. गरजू आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. तीन राज्यांचे राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळतानाही त्यांनी साधेपणा आणि आपुलकी कायम जपली.

शिंदे यांनी सांगितले की, त्यांनी आणि डॉ. डी. वाय. पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभेत अनेक वर्षे एकत्र काम केले. नंतर दोघांनीही राज्यपालपदाची जबाबदारी सांभाळली, मात्र त्यांच्यातील मैत्री आणि जिव्हाळा कधीही कमी झाला नाही. काँग्रेस पक्षाशी त्यांनी अखेरपर्यंत निष्ठा राखली, असेही शिंदे यांनी नमूद केले.

"आज माझा एक जीवाभावाचा सहकारी आपल्यातून निघून गेला आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. त्यांच्या कार्याची आणि सहवासाची आठवण कायम राहील," अशा भावनिक शब्दांत सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.