"नियमानुसार काम जमत नसेल तर राजीनामे द्या"; तुकाराम मुंढेंचा FDA कर्मचाऱ्यांना इशारा
मुंबई : राज्यातील अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त तुकाराम मुंढे
यांनी पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतली आहे. त्यांच्या कार्यपद्धतीविरोधात तक्रार
करणाऱ्या २९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उद्देशून, "ज्यांना
शासनाच्या नियमांनुसार काम करायचे नसेल त्यांनी राजीनामा देऊन निघून जावे,"
असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून
राज्यात भेसळविरोधी विशेष मोहीम राबविण्यात येत असून, अन्न व
औषध प्रशासनाकडून विविध ठिकाणी धाडसत्र सुरू आहे. दरम्यान, छत्रपती
संभाजीनगर येथील राज्य अन्न व औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळेतील २९ अधिकारी व
कर्मचाऱ्यांनी तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीबाबत खात्याचे मंत्री नरहरी
झिरवळ यांच्याकडे तक्रार केली होती. १५ जुलै रोजी सादर करण्यात आलेल्या
निवेदनात दोन शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय, शनिवार-रविवार
आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी काम करण्याचे आदेश, रिक्त
पदांमुळे वाढलेला कामाचा ताण तसेच तपासणीच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता
व्यक्त करण्यात आली होती.
या तक्रारीवर प्रतिक्रिया देताना तुकाराम मुंढे म्हणाले
की, प्रयोगशाळा ही सामान्य शासकीय कार्यालय नसून २४ तास चालणारी अत्यावश्यक
सेवा आहे. त्यामुळे शिफ्ट पद्धतीने काम करणे अपरिहार्य आहे. सध्या कर्मचाऱ्यांकडून दिवसात एकच शिफ्ट घेतली जात असून, आठवड्यात ४८ तासांपेक्षा अधिक काम घेतले जात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट
केले.
मुंढे यांनी सांगितले की, सध्या प्रयोगशाळेत सहा दिवस दोन
शिफ्टमध्ये काम सुरू आहे. भविष्यात गरज भासल्यास २४ तास प्रयोगशाळा सुरू ठेवावी
लागू शकते. त्यामुळे १० ते ६ या पारंपरिक कार्यालयीन वेळेची मागणी मान्य होऊ शकत
नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांनी पुढे सांगितले की, शासनाच्या नियमांनुसार सेवा देणे
प्रत्येक कर्मचाऱ्याचे कर्तव्य आहे. "ज्यांना
नियमांनुसार काम करायचे नसेल त्यांनी राजीनामा द्यावा," असे सांगत त्यांनी कर्मचाऱ्यांना स्पष्ट संदेश दिला.