पुण्यात नवले पुलाजवळ भीषण अपघात; मराठी अभिनेता धनंजय कोळी सहित ८ जणांचा मृत्यू
पुण्यातील नवले पुलावरील गुरुवार, १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघाताने
संपूर्ण शहर हादरले आहे. या दुर्दैवी घटनेत एकूण आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला
असून, घटनेने पुणेकरांना चटका लावला आहे. अपघातात ३० वर्षीय
मराठी अभिनेता धनंजय कोळी यांचाही मृत्यू झाला आहे. धनंजय कोळी हे कार
चालवत होते. दोन भरधाव ट्रकच्या मधोमध कार अडकली आणि अचानक वाहनांना आग लागली. आत
अडकलेल्या पाच जणांना बाहेर पडताही आले नाही. क्षणात भीषण ज्वाळांनी वाहनाला वेढा
घातला आणि सर्वांचा होरपळून मृत्यू झाला. धनंजय कोळी हे मूळचे कोल्हापूर
जिल्ह्यातील जयसिंगपूरचे असून, गेल्या काही वर्षांपासून
पिंपरी-चिंचवडमधील चिखली येथे राहत होते. त्यांनी नाटकांमध्ये काम केले असून
त्यांच्या इन्स्टाग्रामवर त्यांनी स्वतःचा उल्लेख ‘अभिनेता’ असा केला आहे. गेल्या
सहा महिन्यांपासून ते वाहतूकीच्या व्यवसायात कार्यरत होते. धनंजयच्या मृत्यूने
त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या तीन महिन्यांच्या मुलाचे
वडील हरपले असून, नुकतीच त्यांच्या पत्नीने डोहाळ जेवणाची
पोस्ट शेअर केली होती. आनंदात असलेल्या कुटुंबावर हा मोठा आघात झाल्याची भावना
नातेवाईकांनी व्यक्त केली. धनंजयच्या अकाली निधनाने सर्वत्र शोक व्यक्त केला जात
आहे.
सीसीटीव्ही तपासणी सुरू
नवले पुलाजवळ घडलेला अपघात नेमका कसा झाला? याबाबतची तपासणी सुरू आहे. ट्रकचालक मद्यप्राशन करून वाहन चालवत होता का,
याचा तपास पोलीस करत आहेत. भरधाव वेगामुळे नियंत्रण सुटल्याने हा
अपघात झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज
तपासले असून पुढील तपास सुरू आहे.