पुण्यात नवले पुलावर भीषण अपघात; आठ जणांचा होरपळून मृत्यू, परिसरात हळहळ
पुणे : पुण्यातील नवले पुलावर गुरुवारी सायंकाळी घडलेल्या भीषण
अपघाताने शहर हादरले आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची
माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये दोन महिला, एक लहान बाळ आणि चार पुरुषांचा समावेश आहे,
तर काहीजण जखमी झाले आहेत. सायंकाळी सुमारे ५.४५ वाजता धडाधड घटना
घडली. भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू ट्रकने ८–१० वाहनांना जोरदार धडक दिली.
यानंतर ट्रकने एका कारला इतक्या जोरात धडक दिली की कार फरफटत नेऊन पुढील ट्रकला
जाऊन धडकली. कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आणि लगेच स्फोट होऊन भीषण आग लागली. घटनास्थळावर
उपस्थित नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली. दलाचे जवान काही मिनिटांत
घटनास्थळी पोहोचले आणि दोन बंबांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न
सुरू झाला. आग विझल्यानंतर रेस्क्यू पथकाने कटर आणि स्प्रेडरच्या मदतीने कार आणि
ट्रकमधील मृतदेह बाहेर काढले. दृश्य इतकं धक्कादायक होतं की
घटनास्थळी उपस्थित अनेकांचा हृदय पिळवटून गेलं. रुग्णवाहिका चालक सचिन मोरे यांनी
सांगितले, “मी अनेक अपघात पाहिले आहेत, पण आज इतक्या मृतदेहांना पाहून मन सुन्न झालं.” नवले
पूल — ‘डेथ झोन’ म्हणूनच ओळखला जातो या भागात गेल्या काही वर्षांत गंभीर अपघातांची
मालिका घडली असून आता नवले पूल डेथ झोन म्हणून कलंकित झाला आहे.
मागील मोठे अपघात:
- २१ ऑक्टोबर २०२१: कंटेनर–बस धडक, २ मृत
- २१ नोव्हेंबर २०२२: ट्रेलरने ४७ वाहनांचे नुकसान
- १० फेब्रुवारी २०२४: ट्रकची सहा वाहनांना धडक
- २३ फेब्रुवारी २०२४: सात–आठ वाहनांचा अपघात
- ३ मे २०२५: सलग तीन अपघातांत तिघांचा मृत्यू
- २५ जानेवारी २०२५: कार–बस धडक, २ मृत
ही शृंखला लक्षात घेता नवले पुलावरील वाहतूक व्यवस्था आणि
सुरक्षा उपायांबाबत मोठ्या प्रश्नचिन्हांची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.