पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसीत चार नव्या वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी वाराणसी
रेल्वे स्थानकातून चार नव्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे उद्घाटन करण्यात आले.
मोदी यांनी हिरवी झेंडा दाखवून या ट्रेनना रवाना केले. यामध्ये बनारस-खजुराहो, फिरोजपूर-दिल्ली, लखनऊ-सहारनपूर आणि
एर्नाकुलम-बेंगळुरू वंदे भारत एक्सप्रेसचा समावेश आहे. या प्रसंगी प्रवाशांमध्ये
प्रचंड उत्साह दिसून आला. मोदी म्हणाले, “एखाद्या शहराला
चांगली कनेक्टिव्हिटी मिळाली की त्याचा विकास वेगाने होतो. वंदे भारत, नमो भारत आणि अमृत भारत सारख्या ट्रेन भारतीय रेल्वेच्या पुढील पिढीची
पायाभरणी करत आहेत. ही भारतीय रेल्वेचे रूपांतर करण्याची मोहीम आहे.” ते पुढे
म्हणाले, “विकसित देशांमध्ये पायाभूत सुविधा आर्थिक विकासाचे
प्रमुख साधन ठरल्या आहेत. भारत देशही या मार्गावर वेगाने प्रगती करत आहे. नवीन
वंदे भारत ट्रेन या प्रगतीचा मैलाचा दगड ठरतील.”
कोणत्या आहेत ट्रेन्स:
- बनारस-खजुराहो वंदे
भारत एक्सप्रेस: वाराणसी, प्रयागराज, चित्रकूट
आणि खजुराहो यासारख्या धार्मिक स्थळांना जोडेल.
- लखनौ-सहारनपूर वंदे
भारत एक्सप्रेस: प्रवासाचा वेळ
जवळजवळ 1 तासाने
कमी करेल.
- फिरोजपूर-दिल्ली
वंदे भारत एक्सप्रेस: फक्त 6 तास 40 मिनिटांत
प्रवास पूर्ण करणारी सर्वात जलद गाडी.
- एर्नाकुलम-बेंगळुरू
वंदे भारत एक्सप्रेस: 2 तासांपेक्षा
अधिक वेळ वाचवत 8 तास 40 मिनिटांत
प्रवास पूर्ण करेल.
या चार नव्या ट्रेनसह देशात आता १६० हून अधिक वंदे भारत
सेवा कार्यरत झाल्या आहेत, ज्यामुळे प्रवाशांना वेगवान, आरामदायी आणि आधुनिक रेल्वे प्रवासाचा नवा अनुभव मिळणार आहे.