जम्मू-काश्मीरमध्ये नौगाम पोलीस स्टेशनमध्ये भीषण स्फोट; ९ ठार, २९ जखमी

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे नौगाम पोलीस स्टेशनमध्ये शुक्रवारी रात्री सुमारे ११:२० वाजता मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत किमान नऊ जण ठार झाले असून २९ जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांमध्ये अनेक पोलिस कर्मचारी आणि फॉरेन्सिक टीमचे अधिकारी आहेत. पाच जणांची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जखमींवर ९२ आर्मी बेस हॉस्पिटल आणि एसकेआयएमएस सौरा येथे उपचार सुरू आहेत. हा स्फोट त्या वेळी झाला, जेव्हा पोलीस आणि फॉरेन्सिक टीम फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूल प्रकरणात जप्त केलेल्या स्फोटकांचे नमुने घेत होते. हरियाणातील फरीदाबाद येथून डॉ. मुजम्मिल गनई यांच्या भाड्याच्या घरातून ३६० किलो स्फोटक रसायनं, डेटोनेटर, वायरिंग व आयईडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले होते. हीच सामग्री तपासणीसाठी नौगाम पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आली होती. नमुना प्रक्रिया सुरू असतानाच अचानक भीषण स्फोट झाला आणि पोलीस स्टेशनचा मोठा भाग कोसळला. स्फोटानंतर अनेक छोट्या स्फोटांचे आवाज येत राहिल्याने बचाव कार्यात अडथळे येत होते. बॉम्ब निकामी पथक, सुरक्षा दल आणि आपत्कालीन सेवा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या.

या स्फोटाबाबत दोन शक्यता तपासल्या जात आहेत—

1.       अपघाती स्फोट: रसायनांचे रिऍक्शन किंवा चुकीची हाताळणी

2.      दहशतवादी हल्ला: बाह्य हस्तक्षेप किंवा रिमोट ट्रिगरची शक्यता

पीपल्स अँटी-फॅसिस्ट फ्रंट या दहशतवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा केला असला तरी अधिकृत पुष्टी अद्याप झाली नाही. ही घटना १० नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्लाजवळ झालेल्या कार ब्लास्टशी संबंधित असल्याचेही तपासात समोर येत आहे. दोन्ही घटनांमध्ये एकाच दहशतवादी मॉड्यूलचा सहभाग असू शकतो, असा संशय तपास यंत्रणांकडून व्यक्त होत आहे. घटनेमुळे जम्मू-काश्मीरमध्ये उच्च सतर्कता जारी करण्यात आली असून तपास NIA, SIA आणि स्थानिक पोलिसांकडून वेगाने सुरू आहे.