मंगळवेढ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण; मुख्यमंत्री फडणवीस आणि मनोज जरांगे पाटील एकाच व्यासपीठावर

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण येत्या रविवारी (२६ ऑक्टोबर) होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, तसेच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि मनोज जरांगे पाटील हे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर दिसणार असल्याने, राज्याचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागले आहे. ही माहिती आमदार समाधान अवताडे यांनी दिली. अवताडे यांनी सांगितले, “छत्रपती शिवरायांच्या या अश्वारूढ पुतळ्याची निर्मिती सर्व समाज, धर्म, पक्ष यांची इच्छा होती. त्यामुळे सर्वांच्या मागणीनुसार आम्ही मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे व पवार, छत्रपती संभाजी महाराज आणि मनोज जरांगे यांना आमंत्रित केले आहे. हे सर्वजण कार्यक्रमास हजर राहतील.” मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री आणि जरांगे पाटील यांची ही पहिली सार्वजनिक भेट आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळांचे विशेष लक्ष लागले आहे. दरम्यान, मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा आणि मनोज जरांगे पाटील यांनी केलेली कर्जमाफीची मागणी देखील या भेटीत चर्चेचा विषय ठरू शकते. राज्याच्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढ्यातील हा कार्यक्रम मोठ्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरणार आहे.