पुण्यात सायबर सुरक्षा जनजागृती मोहिमेअंतर्गत शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

पुणे : एस.पी. कॉलेजचे सायबर सुरक्षा वॉरियर्स आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या मोहिमेअंतर्गत पुण्यातील विविध शाळांमध्ये जसे की साधना इंग्लिश स्कूल, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, अहिल्यादेवी गर्ल्स स्कूल, एस.एम. जोशी कॉलेज आदी ठिकाणी ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती सत्रांचे आयोजन करण्यात आले. या सत्रांचे नेतृत्व अर्जुन आंबेकर आणि वेद रवाणे यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना आकर्षक सादरीकरणे व वास्तव जीवनातील उदाहरणांद्वारे सुरक्षित ऑनलाइन वापराविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना डिजिटल जगात सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक ज्ञान मिळवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या डिजिटल युगात सायबर गुन्हे टाळण्यासाठी, वैयक्तिक माहितीचे संरक्षण करण्यासाठी व तंत्रज्ञानाचा सुरक्षित वापर करण्यासाठी सायबर सुरक्षा जनजागृती अत्यंत आवश्यक आहे. या अभियानात ईशा व अवंती यांच्या मार्गदर्शनासह क्विक हील फाउंडेशनच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे विशेष कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या चर्चेत उत्स्फूर्त सहभाग घेतला, स्वतःचे ऑनलाइन अनुभव शेअर केले आणि संवादात्मक उपक्रमांचा आनंद घेतला. त्यामुळे हे सत्र शैक्षणिकदृष्ट्या उपयुक्त तसेच प्रभावी ठरले.