लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ भीषण स्फोट; आठ ठार, वीस जखमी — पुलवामाशी संबंध संशयात
दिल्ली: राजधानी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी
संध्याकाळी ६:५२ वाजता झालेल्या भीषण स्फोटाने देश हादरला आहे. पांढऱ्या रंगाच्या ह्युंदाई
आय२० कारमध्ये स्फोट झाला, ज्यात आठ जणांचा मृत्यू झाला आणि २० जण
गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी UAPA कायद्याअंतर्गत
गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
या स्फोटात उच्च दर्जाचे स्फोटक — अमोनियम नायट्रेटचा वापर करण्यात
आला होता. कारचे क्रमांक HR 26CE7674 असल्याचे समोर आले असून,
सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक संशयित व्यक्ती आत बसलेला दिसतो.
कार खरेदीचा मागोवा — पुलवामाशी संबंध:
तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे. स्फोटासाठी वापरलेली
कार २९ ऑक्टोबर रोजी पुलवामा येथील एका रहिवाशाने खरेदी केली होती. गुडगावच्या एका
व्यक्तीकडून दोन वेळा विक्री झाल्यानंतर ही कार काश्मीरच्या रहिवाशाकडे पोहोचली
होती. पोलिसांनी सध्याच्या मालकाचा तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासानुसार, ही कार लाल किल्ल्याजवळ तीन तासांहून अधिक काळ उभी होती. सीसीटीव्ही
फुटेजमध्ये दुपारी ३:१९ वाजता पार्किंगमध्ये दाखल झाल्यानंतर ती संध्याकाळी ६:४८
वाजता बाहेर पडताना दिसते. चालकाने त्या काळात कारमधून बाहेर न पडता आतच
राहिल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनास्थळ आणि तपासाचा विस्तार:
सीसीटीव्हीमध्ये दिसते की, कार दर्या गंज, कश्मीरी गेट आणि सुनेहरी मशिदीजवळ फिरताना दिसली
होती. ड्रायव्हरने निळा आणि काळा टी-शर्ट घातलेला असून, तो
हात खिडकीतून बाहेर काढताना दिसतो.
पोलिसांनी सर्व मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेज जप्त करून कारच्या
हालचालींचा मागोवा घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, दिल्ली
पोलिस आयुक्त सतीश गोलचा यांनी सांगितले की, कारमध्ये एकाहून
अधिक व्यक्ती होत्या की नाही याची खात्री करण्यासाठी चौकशी सुरू आहे. याच
स्फोटाच्या एक दिवस आधी, जम्मू-काश्मीर पोलिसांनी हरियाणातील
फरीदाबाद येथे ३५० किलो स्फोटके जप्त केली होती, त्यामुळे
दोन्ही घटनांमध्ये संबंध असल्याचा संशय तपासात घेतला जात आहे.
घटनेनंतर दिल्लीत तणाव:
स्फोटानंतर काही मिनिटांतच पोलिस, एनएसजी, आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या.
जखमींना एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळ सील
करून एफएसएल तज्ज्ञांकडून सॅम्पल तपासले जात आहेत. संपूर्ण परिसरात उच्च सुरक्षा
अलर्ट जारी करण्यात आला आहे.