14 वर्षीय मुलाचा रेबीजने मृत्यू; कुत्रा चावल्यानंतर इंजेक्शन घेण्याचे महत्त्व अधोरेखित

गाझियाबाद : कुत्रा चावल्यानंतर इंजेक्शन न घेतल्याने
रेबीजची लागण होऊन 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची
धक्कादायक घटना घडली आहे. दीड महिन्यांपूर्वी शेजाऱ्यांच्या कुत्र्याने मुलाला
चावा घेतला होता. मात्र पालकांच्या भीतीने त्याने ही गोष्ट लपवून ठेवली. हळूहळू
त्याची प्रकृती खालावत गेली. तोंडातून लाळ येणे, पाण्याची
भीती वाटणे अशी रेबीजची गंभीर लक्षणे दिसू लागली. अखेरीस ऍम्ब्युलन्समधून
रुग्णालयात नेत असताना त्याचा वडिलांच्या मांडीवरच मृत्यू झाला. तपासात समोर आले
की मुलाच्या शरीरात रेबीज विषाणू पूर्णपणे पसरला होता. तज्ज्ञांच्या मते, कुत्रा चावल्यानंतर त्वरित (२४ तासांच्या आत) अँटी-रेबीज इंजेक्शन व सीरम
घेणे अत्यावश्यक आहे. उशीर झाल्यास जीव वाचवणे जवळपास अशक्य होते. रेबीज हा
मध्यवर्ती मज्जासंस्थेला हानी पोहोचवणारा आणि प्राणघातक ठरू शकणारा आजार आहे. याची
लागण केवळ कुत्र्याच नव्हे, तर इतर अनेक मांसाहारी
प्राण्यांच्या चाव्यामुळेही होऊ शकते. त्यामुळे चाव्यानंतर लगेच जखम स्वच्छ धुणे
आणि वैद्यकीय सल्ला घेणे हेच सुरक्षिततेचे एकमेव उपाय आहेत.