IND vs SA: भारताचा द. आफ्रिकेवर ३० धावांनी विजय, टी-२० मालिका ३-१ ने खिशात

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि निर्णायक टी-२० सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ३० धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांची टी-२० मालिका ३-१ अशा फरकाने आपल्या नावावर केली. टी-२० विश्वचषक २०२४ नंतर भारतीय संघाचा या फॉरमॅटमधील हा सलग सातवा द्विपक्षीय मालिका विजय ठरला आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ५ गडी गमावून २३२ धावांचा डोंगर उभा केला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या तिलक वर्माने ४२ चेंडूंत ७३ धावांची स्फोटक खेळी केली. हार्दिक पंड्याने अवघ्या २५ चेंडूंत ६३ धावा करत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर तुफान हल्ला चढवला. सलामीवीर संजू सॅमसन (३७) आणि अभिषेक शर्मा (३४) यांनीही संघाला भक्कम सुरुवात करून दिली. २३३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली होती. क्विंटन डी कॉक आणि रीझा हेंड्रिक्स यांनी पहिल्या सहा षटकांत ६७ धावा जोडल्या. मात्र, वरुण चक्रवर्तीने हेंड्रिक्सला बाद करत भागीदारी तोडली. त्यानंतर डी कॉकला ६५ धावांवर जसप्रीत बुमराहने बाद केले. एका टप्प्यावर ११८/२ अशा मजबूत स्थितीत असलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ १३५ धावांपर्यंत निम्मा गारद झाला. वरुण चक्रवर्तीने ५३ धावा देत ४ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराहने किफायतशीर गोलंदाजी करत ४ षटकांत १७ धावांत २ विकेट्स घेतल्या. अर्शदीप सिंग आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. अखेर दक्षिण आफ्रिकेचा संघ २० षटकांत ९ बाद २०१ धावांपर्यंतच मजल मारू शकला आणि भारताने सामना तसेच मालिका जिंकली.