अंबरनाथ नगरपरिषद निवडणूक: मतदानाच्या आदल्या दिवशी EVM छेडछाडीचा आरोप, राजकीय खळबळ
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपरिषदेच्या सार्वत्रिक
निवडणुकीसाठी शनिवार, २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या
पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने सुमारे १५०० पोलीस अधिकारी आणि
कर्मचाऱ्यांची तैनाती केली आहे. मात्र, मतदानाच्या आदल्या
दिवशी शिवसेना (शिंदे गट) ने EVM मशीनमध्ये छेडछाड झाल्याचा
गंभीर आरोप केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. शिंदे गटाचे उमेदवार शैलेश भोईर
यांनी भाजप उमेदवाराचा भाऊ तुषार तेलंगे याच्यावर थेट आरोप केला आहे. अंबरनाथमधील
साऊथ इंडियन शाळेत उभारलेल्या मतदान केंद्रावर पॅनल क्रमांक ५ मधील EVM मशीनमध्ये छेडछाड झाल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. या आरोपानंतर शिंदे
गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मतदान केंद्राबाहेर जमा झाले. यावेळी शासकीय
कर्मचाऱ्यांसोबत जोरदार वाद झाला. शिंदे गटाचे नेते गोपाळ लांडगे यांनी संबंधित EVM
मशीन तातडीने बदलण्याची तसेच संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून
दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अंबरनाथ हा शिंदे गटाचा बालेकिल्ला मानला जात असला, तरी भाजपसोबत युती असूनही दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने या आरोपांची गंभीर दखल घेत तपास सुरू केल्याची माहिती दिली आहे. प्रशासनाने सर्व राजकीय पक्षांनी शांतता राखावी आणि मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.