पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक-वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा देण्याचे महापौर विनायक कोंड्याल यांचे निर्देश
सोलापूर :- श्री संत गजानन महाराज (शेगाव) पालखी सोहळ्याच्या
पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील भाविक आणि हजारो वारकऱ्यांना आवश्यक नागरी सुविधा
सुरळीत उपलब्ध करून देण्यासाठी महापौर विनायक कोंड्याल यांच्या
अध्यक्षतेखाली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात आढावा बैठक पार पडली. बैठकीत
पालखी मार्गावरील स्वच्छता, रस्त्यांची दुरुस्ती, प्रकाश व्यवस्था, पाणीपुरवठा, आरोग्य
सेवा, वाहतूक नियोजन, मुक्कामाची
व्यवस्था तसेच वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध सुविधांवर
सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीला स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते,
महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, पोलीस उपायुक्त प्रीतम
यावलकर, उपायुक्त सोनाली यादव, नगरसेविका राजेश्री दोडमणी, सहाय्यक पोलीस
आयुक्त सुधीर खिराडकर, नगर अभियंता सारिका आकूलवार,
आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने, पशुवैद्यकीय
अधिकारी डॉ. सतीश चौगुले, कार्यकारी अभियंता
(विद्युत) राजेश परदेशी, तसेच पालखी सोहळ्याचे
स्थानिक प्रतिनिधी सुनील फाळके आणि सुनील कुलकर्णी यांच्यासह
महानगरपालिकेचे विभागप्रमुख उपस्थित होते. यावेळी पालखी सोहळ्याच्या प्रतिनिधींनी
दरवर्षी मिळणाऱ्या महानगरपालिकेच्या सहकार्याबद्दल आभार मानले. स्वागतस्थळी
अतिरिक्त स्वच्छता कर्मचारी, फिरते स्वच्छता पथक, पुरेशी प्रकाश व्यवस्था, मुक्कामाच्या ठिकाणी फोकस
लाईट, पिण्याच्या पाण्याचे टँकर आणि रुग्णवाहिका उपलब्ध
ठेवण्याची मागणी करण्यात आली.
महापौर विनायक कोंड्याल यांनी सर्व विभागांना समन्वयाने
काम करण्याचे निर्देश देत पालखी मार्गाची संपूर्ण स्वच्छता, रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविणे, झाडांच्या
फांद्यांची छाटणी, अखंड प्रकाश व्यवस्था, पिण्याचे पाणी, मोबाइल स्वच्छतागृहे, आरोग्य पथके, रुग्णवाहिका आणि प्राथमिक उपचार सुविधा
उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. याशिवाय, वारकऱ्यांच्या
मुक्कामासाठी स्वच्छ आणि सुरक्षित परिसर, नियमित कचरा संकलन,
स्वच्छतागृहांची देखभाल तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी आरोग्य आणि
आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले.
यावर्षी पालखी मार्गात काही बदल झाल्यामुळे नव्याने
समाविष्ट झालेल्या मार्गांवरही सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश
महापौरांनी दिले. तसेच महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने समन्वय ठेवून वाहतूक, सुरक्षा आणि गर्दी व्यवस्थापन प्रभावीपणे हाताळावे, असेही
त्यांनी सांगितले. महापौर विनायक कोंड्याल म्हणाले, "श्री संत गजानन महाराज पालखी सोहळा हा श्रद्धा, सेवा
आणि समन्वयाचा उत्सव आहे. सोलापूरात येणाऱ्या प्रत्येक भाविक आणि वारकऱ्याला
स्वच्छ, सुरक्षित आणि सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे
ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून पालखी सोहळा
यशस्वी करावा."