हनिमूनसाठी फर्स्ट AC कोचमध्ये अनधिकृत सजावट; रेल्वेची कठोर कारवाई, डेकोरेटरवर गुन्हा

बल्लारशाह-मुंबई नांदिग्राम एक्स्प्रेस (रेल्वे क्रमांक 11002) च्या प्रथम वातानुकूलित (First AC) डब्यात हनिमूनसाठी करण्यात आलेल्या अनधिकृत सजावटीच्या प्रकरणाची रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. जालना येथील एका खासगी डेकोरेटरने कोणतीही अधिकृत परवानगी न घेता फर्स्ट एसी कूपेमध्ये प्रवेश करून सजावट केल्याचे समोर आल्यानंतर संबंधितांविरोधात कठोर कारवाई करण्यात आली आहे.

रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही खासगी व्यक्तीला किंवा व्यावसायिक सेवा पुरवठादाराला आवश्यक परवानगीशिवाय रेल्वे किंवा आरक्षित डब्यांमध्ये प्रवेश करण्याची परवानगी नाही. प्रवाशांनी सजावट किंवा इतर सेवांसाठी अशा अनधिकृत व्यक्तींची नियुक्ती करू नये, कारण हे रेल्वे नियमांचे उल्लंघन आहे.

माहितीनुसार, ६ जुलै रोजी संबंधित डेकोरेटरने जालना स्थानकावरून रेल्वेत प्रवेश करून प्रथम वातानुकूलित कूपेची सजावट केली. आरक्षित फर्स्ट एसी डब्यात अधिकृत परवानगीशिवाय प्रवेश झाल्याने रेल्वे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा डब्यांमध्ये केवळ अधिकृत प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी यांनाच प्रवेशाची परवानगी असते.

या घटनेत तिकीट तपासणी कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे अनधिकृत प्रवेश झाल्याचे प्रथमदर्शनी आढळल्याने संबंधित कर्मचाऱ्याला चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. तसेच, संपूर्ण घटनेची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असून चौकशी अहवालानुसार दोषींवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.

याशिवाय, संबंधित डेकोरेटरविरोधात रेल्वे कायद्यानुसार अनधिकृत प्रवेश, वैध तिकीटाशिवाय प्रवास आणि रेल्वे परिसरात अतिक्रमण यांसारखे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. प्रवाशांची सुरक्षितता आणि रेल्वेची सुरक्षा व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नियमांची कठोर अंमलबजावणी केली जाईल. भविष्यात अशा प्रकारच्या नियमभंगाविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती नांदेड रेल्वे विभागाने दिली आहे.