सोलापूरच्या 'बी-२' जागांवरील निर्बंध हटणार; महसूलमंत्री बावनकुळे यांची मोठी घोषणा
सोलापूर शहरातील हजारो बी-२ सत्ताप्रकारच्या
जागाधारकांसाठी मोठा दिलासा देणारी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
यांनी विधानमंडळाच्या अधिवेशनात केली. बी-२ जागांवरील निर्बंध हटवून त्या फ्रीहोल्ड
(मुक्त) करण्याची प्रक्रिया शासन राबविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. या
निर्णयामुळे संबंधित जागांवरील बांधकाम परवानगीचा मार्ग मोकळा होणार असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नाच्या समाधानाची दिशा स्पष्ट
झाली आहे. शहरातील हजारो नागरिकांना या निर्णयाचा थेट लाभ होण्याची अपेक्षा व्यक्त
केली जात आहे.
या घोषणेनंतर सोलापूर शहरात आनंदाचे वातावरण निर्माण
झाले. बी-२ प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी निर्णयाचे स्वागत करत जल्लोष साजरा
केला. महापौर विनायक कोंड्याल यांच्या उपस्थितीत भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी आणि बी-२ जागाधारकांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त
केला. हा निर्णय सोलापूरच्या शहरी विकासाला मोठी चालना देणारा ठरेल, अशी प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली. बी-२ सत्ताप्रकारातील
जागांमुळे अनेक नागरिकांना मालकी हक्क, बांधकाम परवानगी,
बँक कर्ज, खरेदी-विक्री तसेच पुनर्विकास
प्रक्रियेत विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. शासनाच्या या निर्णयामुळे या
अडथळ्यांवर मात होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक शासन निर्णय (GR)
आणि पुढील कार्यपद्धती लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर
प्रत्यक्ष अर्ज प्रक्रिया सुरू होऊन लाभार्थ्यांना दिलासा मिळण्यास सुरुवात होणार
आहे. त्यामुळे सोलापूरच्या विकासाला नवी गती मिळण्याबरोबरच हजारो बी-२
मिळकतधारकांचे अनेक वर्षांचे स्वप्न साकार होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल
पडल्याची भावना व्यक्त होत आहे.