पाण्याच्या टाक्यांच्या दुरवस्थेविरोधात अभिनव सामाजिक संस्थेचे अनोखे निषेध आंदोलन; रांगोळी काढून, हार घालून पालिका प्रशासनाचा निषेध
सोलापूर, दि. ८ ऑक्टोबर २०२६ : शहरातील
पाण्याच्या टाक्यांच्या दुरवस्थेविरोधात अभिनव सामाजिक संस्थेच्या वतीने प्रभाग
क्रमांक १४ मधील पाण्याच्या टाकी परिसरात अनोखे निषेध आंदोलन करण्यात आले.
पाण्याच्या टाक्यांची अस्वच्छता, परिसरातील सुरक्षेचा अभाव आणि महापालिका
प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी रांगोळी काढून
तसेच पाण्याच्या टाकीला हार घालून व फुले वाहून निषेध नोंदविला. सोलापूर शहरातील
हाय-लेव्हल पाण्याच्या टाक्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरली असून,
सुरक्षेचीही पुरेशी व्यवस्था नसल्याचा आरोप अभिनव सामाजिक संस्थेने
केला आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संस्थेच्या वतीने
महानगरपालिका प्रशासनाला लेखी निवेदन देण्यात आले होते. त्यामध्ये समस्येचे
निराकरण करण्यासाठी २४ तासांचा अल्टिमेटम देण्यात आला होता. मात्र, प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही न झाल्याने संस्थेच्या कार्यकर्त्यांनी
थेट पाण्याच्या टाकी परिसरात जाऊन आंदोलन केले.
आंदोलनादरम्यान पाण्याच्या टाकीजवळ रांगोळी काढून
प्रशासनाचा निषेध करण्यात आला. तसेच पाण्याच्या टाकीला हार घालून आणि फुले वाहून
अनोख्या पद्धतीने पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. नागरिकांना शुद्ध पिण्याचे
पाणी उपलब्ध करून देणे ही महानगरपालिकेची मूलभूत जबाबदारी आहे. मात्र, पाण्याच्या टाक्यांच्या परिसरातील अस्वच्छता आणि सुरक्षेच्या अभावामुळे
नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचा आरोप यावेळी
आंदोलनकर्त्यांनी केला.
या आंदोलनाचे नेतृत्व अभिनव सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा
मीनल दास यांनी केले. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख सरोजिनी मकाई, जिल्हाध्यक्षा अरुणा जाधव, जिल्हासंघटक अनिता
वाघमारे, जिल्हा कार्याध्यक्षा जयश्री हिरेमठ, जिल्हा उपाध्यक्ष स्वाती घंटे, शहर उपाध्यक्ष आफ्रीन
पटेल, दक्षिण शहराध्यक्ष योगेश्री निंबाळे यांच्यासह
संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रभाग क्रमांक १४ तसेच संपूर्ण सोलापूर शहरातील
पाण्याच्या टाक्यांच्या परिसराची एका आठवड्यात स्वच्छता करून आवश्यक सुरक्षा
व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी संस्थेने केली आहे.
ही कार्यवाही न झाल्यास महापालिका प्रशासनाविरोधात संपूर्ण शहरात तीव्र आंदोलन आणि
ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा अध्यक्षा मीनल दास आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी
दिला आहे.