सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्यांवर कारवाई; गुरुनानक चौक, साधू वासवानी बगीचा परिसरात पोलिसांची धडक
सोलापूर : शहर स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या पाहणीदरम्यान
गुरुनानक चौक, साधू वासवानी बगीचा परिसरात
मध्यरात्रीनंतर सार्वजनिक ठिकाणी काही युवक मद्यप्राशन करताना आढळून आले. या
प्रकाराची माहिती मिळताच संबंधित प्रशासन व पोलिसांनी कारवाई केली.
मद्यप्राशनासाठी वापरलेल्या दारूच्या बाटल्या, ग्लास आणि इतर साहित्यही परिसरात आढळून आले. विशेष म्हणजे हे साहित्य
महापालिका कार्यालयाच्या परिसरालगत आढळून आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, एकवीस नंबर शाळा परिसरात सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्यांवर राज्य
उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले.
सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारांना आळा बसणे आवश्यक असून, नागरिकांना विशेषतः महिला आणि कुटुंबीयांना सुरक्षित वातावरण मिळणे गरजेचे आहे. स्वच्छता मोहिमेसोबतच शहरातील सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ, सुरक्षित आणि नागरिकांसाठी निर्भय ठेवण्यासाठी प्रशासनाने सातत्याने कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन किंवा इतर गैरप्रकार आढळल्यास नागरिकांनी त्याची माहिती संबंधित प्रशासन व पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनी केले आहे.