कचरा कुंडी दत्तक घेऊया; आमदार देवेंद्र कोठेंचे सोलापूरकरांना आवाहन
सोलापूर : शहर स्वच्छतेच्या मुद्द्यावर सातत्याने आग्रही असलेले भाजप
आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूर शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ‘कचरा कुंडी
दत्तक घेऊया’ ही नाविन्यपूर्ण संकल्पना मांडली आहे. आपल्या परिसरातील कचरा कुंडीची
जबाबदारी नागरिकांनी स्वीकारावी आणि सामूहिक सहभागातून स्वच्छ, सुंदर
व धुळमुक्त सोलापूर घडवावे, असे आवाहन आमदार कोठे यांनी केले
आहे.
गेल्या काही दिवसांपासून आमदार देवेंद्र कोठे रात्री-अपरात्री शहरातील
विविध भागात जाऊन स्वच्छतेची पाहणी करत आहेत. ७० फूट रोड तसेच स्ट्रीट पार्क
परिसरातील अस्वच्छतेचे प्रकार त्यांनी निदर्शनास आणून दिले होते. आता केवळ
प्रशासनाला दोष न देता नागरिकांनीही स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, या
उद्देशाने त्यांनी ‘कचरा कुंडी दत्तक घेऊया’ ही मोहीम सुरू करण्याचे आवाहन केले
आहे.
घराशेजारी, दुकानाजवळ किंवा सोसायटी परिसरात असलेल्या कचरा कुंडीची स्वच्छता राखण्याची जबाबदारी स्थानिक नागरिक, मंडळे आणि व्यापारी संघटनांनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. कचरा कुंडीच्या आजूबाजूला कचरा टाकला जाणार नाही, ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे टाकला जाईल तसेच कचरा कुंडी भरल्यास तत्काळ महापालिकेला माहिती दिली जाईल, याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रस्त्यावर कचरा टाकताना कोणी आढळल्यास त्याचा फोटो काढून महापालिका प्रशासन किंवा आमदार कोठे यांच्याकडे पाठवावा. फोटो पाठवणाऱ्या नागरिकाचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे.
‘स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून आपल्या प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. कचरा कुंडी दत्तक घेऊया आणि स्वच्छ सोलापूरच्या अभियानात सहभागी होऊया,’ असे आवाहन आमदार देवेंद्र कोठे यांनी केले.‘स्वच्छ सोलापूर • सुंदर सोलापूर • धुळमुक्त सोलापूर’ हा संदेश देत त्यांनी शहरातील नागरिकांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.