MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात विद्यार्थ्यांचे सत्याग्रह आंदोलन; प्रणिती शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल

पुणे : MPSC परीक्षेतील पेपरफुटी, गैरप्रकार, परीक्षेतील अनियमितता तसेच भरती प्रक्रियेतील विविध प्रश्नांवरून विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुण्यात विद्यार्थ्यांकडून सत्याग्रह आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला काँग्रेस नेत्या तथा खासदार प्रणिती शिंदे यांनी भेट देत आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या आणि समस्या जाणून घेतल्या.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न असताना सरकारने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू नये. विद्यार्थ्यांचा आवाज ऐकला गेला पाहिजे, अशी भूमिका प्रणिती शिंदे यांनी मांडली. मात्र सरकार विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत त्यांनी फडणवीस सरकार आणि मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

“विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न असताना सरकारने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू नये. विद्यार्थ्यांचा आवाज ऐकला पाहिजे. पण हे सरकार निगरगट्ट झाले आहे,” असा हल्लाबोल प्रणिती शिंदे यांनी केला.

MPSC परीक्षेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीला समर्थन देत “विवेक भीमनवार यांची विकेट जाणारच,” असे वक्तव्य प्रणिती शिंदे यांनी यावेळी केले. पेपरफुटी, परीक्षेतील गैरप्रकार व अनियमितता आणि भरती प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली नाराजी दूर करण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

यावेळी आमदार विश्वजीत कदम, आमदार रोहित पवार, सुनील केदार, सुजात आंबेडकर, उपोषणकर्ते शिवराज मोरे, सोलापूरचे माजी नगरसेवक मनोज यलगुलवार, सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, दक्षिण युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष अनंत म्हेत्रे, उपाध्यक्ष सचिन पवार, पियुष इंगळे, अमोगसिद्ध ख्याडे आणि अमित देशमुख उपस्थित होते.