शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स 800 अंकांनी कोसळला, आयटी शेअर्समध्ये जोरदार विक्री
भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी मोठी घसरण नोंदवली गेली.
आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी बाजार उघडताच विक्रीचा जोर वाढला आणि
गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला. मुंबई शेअर बाजाराचा (BSE) सेन्सेक्स 800 हून अधिक अंकांनी घसरला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (NSE) निफ्टीही 200
अंकांच्या आसपास खाली आला. व्यवहाराच्या सुरुवातीला सेन्सेक्स 77,409
या मागील बंद पातळीच्या तुलनेत घसरून 76,852 वर
उघडला. त्यानंतर विक्रीचा दबाव आणखी वाढत गेल्याने निर्देशांक 76,605 या पातळीपर्यंत खाली आला. त्यामुळे बाजारात चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
निफ्टीमध्येही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. मागील
सत्रात 24,168 वर बंद झालेला निफ्टी 23,991 वर उघडला आणि पुढे 23,939
पर्यंत घसरला. बाजारातील व्यापक विक्रीमुळे गुंतवणूकदारांची संपत्ती
मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याचे चित्र दिसून आले. या घसरणीचा सर्वाधिक फटका आयटी
क्षेत्राला बसला. देशातील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या
प्रमाणात विक्री झाली. इन्फोसिसचा शेअर सुमारे 8.5 टक्क्यांनी
घसरला, तर टीसीएसमध्ये 6 टक्क्यांहून
अधिक घसरण झाली. याशिवाय टेक महिंद्रा आणि एचसीएल टेक यांच्याही शेअर्समध्ये 5
टक्क्यांपेक्षा जास्त घसरण नोंदवण्यात आली.
तज्ज्ञांच्या मते, जागतिक बाजारातील अनिश्चितता, अमेरिकेतील आर्थिक घडामोडी, तंत्रज्ञान क्षेत्रावरील
दबाव आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या भूमिकेचा परिणाम भारतीय आयटी कंपन्यांच्या
शेअर्सवर दिसून आला आहे. त्यामुळे संपूर्ण बाजारावर नकारात्मक परिणाम झाला. बाजारातील
या घसरणीमुळे अल्पकालीन गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली असली तरी दीर्घकालीन
गुंतवणूकदारांनी घाबरून निर्णय घेण्याऐवजी बाजारातील मूलभूत परिस्थिती आणि जागतिक
संकेतांवर लक्ष ठेवावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.