अवैध वाहतुकीवर कारवाईचा परिणाम; पुणे विभागातील एसटीचे उत्पन्न १५ दिवसांत तब्बल ६ कोटींनी वाढले
राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) उत्पन्नात वाढ
करण्यासाठी बसस्थानक परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात राबविण्यात आलेल्या
विशेष मोहिमेचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. गेल्या १५ दिवसांत राज्यभरात
एसटीच्या उत्पन्नात तब्बल ४३ कोटी ८३ लाख रुपयांची वाढ झाली असून, त्यामध्ये पुणे विभागाचा सर्वाधिक वाटा असल्याची माहिती समोर आली आहे. एसटी
स्थानकाच्या २०० मीटर परिसरात खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना थांबण्यास
बंदी असतानाही अनेक ठिकाणी खासगी बस, कॅब आणि इतर वाहने
प्रवाशांची वाहतूक करत होती. यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येवर आणि महसुलावर
परिणाम होत होता. या पार्श्वभूमीवर १ जूनपासून राज्यभर विशेष कारवाई मोहीम सुरू
करण्यात आली. पुण्यातील शिवाजीनगर आणि स्वारगेट बसस्थानक परिसरात परिवहन विभाग,
प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), पोलीस आणि
एसटी प्रशासनाने संयुक्तपणे दररोज कारवाई केली.
या मोहिमेमुळे पुणे विभागाच्या उत्पन्नात ५ कोटी ९७ लाख
रुपयांची अतिरिक्त वाढ नोंदविण्यात आली आहे. प्रवाशांचा ओढा पुन्हा एसटीकडे
वाढल्याने महामंडळाच्या दैनंदिन उत्पन्नात सरासरी ३ कोटी रुपयांची वाढ झाल्याचे
प्रशासनाने सांगितले. परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांच्या निर्देशानुसार ही
मोहीम राबविण्यात आली असून, न्यायालयीन आदेशांची प्रभावी
अंमलबजावणी करण्यात आली. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, अवैध
वाहतुकीविरोधातील कारवाई पुढील काळात अधिक तीव्र करण्यात येणार आहे.
प्रवाशांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि कायदेशीर सार्वजनिक
वाहतूक सेवा उपलब्ध करून देणे हे सरकारचे प्राधान्य असून, या
मोहिमेमुळे एसटी महामंडळ आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होईल, असा
विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पुणे प्रादेशिक
परिवहन कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपामुळे कार्यालयीन
कामकाजावर परिणाम होत असून, प्रशासनाने हा संप अनधिकृत
असल्याचे स्पष्ट करत कर्मचाऱ्यांना तत्काळ कामावर रुजू होण्याचे आवाहन केले आहे.