सोलापुरातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना; प्रस्तावित उड्डाणपुलांच्या कामांचा महापौरांकडून आढावा

सोलापूर शहरातील वाढती वाहतूक कोंडी दूर करून नागरिकांना अधिक सुरक्षित, सुलभ आणि जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्तावित उड्डाणपूल प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी महापालिकेच्या परिषद सभागृहात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीचे अध्यक्षस्थान महापौर विनायक दादा कोंड्याल यांनी भूषविले.

बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्रजी काळे, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, नगरसेविका रोहिणी तडवळकर, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जुना पुणा नाका ते कंबर तलाव आणि मार्केट यार्ड ते कंबर तलाव या दोन महत्त्वाच्या उड्डाणपूल प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या क्षेत्रांची माहिती संबंधित विभागांकडून सादर करण्यात आली.

उड्डाणपूल उभारणीसाठी आवश्यक असलेल्या जमिनींच्या संपादन व हस्तांतरणाबाबत विविध विभागांशी समन्वय साधण्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. या प्रकल्पांमुळे केंद्र शासन, राज्य शासन, रेल्वे, पोलीस, पोस्ट, बीएसएनएल, संरक्षण विभाग तसेच खासगी मालमत्तांच्या काही जागा बाधित होणार असल्याने आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. बैठकीत संबंधित विभागांकडून आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्रे (NOC), तांत्रिक मंजुरी, जमीन हस्तांतरण प्रक्रिया तसेच प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान येणाऱ्या अडचणींवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, अशा सूचना महापौरांनी दिल्या.
सोलापूर शहराच्या भविष्यातील वाहतूक गरजा लक्षात घेता हे उड्डाणपूल अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून वाहतूक कोंडी कमी करण्यास, वेळ व इंधनाची बचत करण्यास मोठी मदत होणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

महापौर विनायक दादा कोंड्याल म्हणाले,
"सोलापूर शहराच्या विकासासाठी प्रस्तावित उड्डाणपूल प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे आहेत. या कामांमुळे वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होईल. सर्व संबंधित विभागांनी आवश्यक समन्वय साधून प्रक्रिया गतीमान करावी, जेणेकरून हे प्रकल्प वेळेत पूर्ण होतील."