राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर? व्हायरल बातमीमागील सत्य समोर

मुंबई : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांची नियुक्ती झाल्याची बातमी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मीरा बोरवणकर यांची राज्य महिला आयोग अध्यक्षपदी अद्याप कोणतीही अधिकृत नियुक्ती झालेली नाही. या संदर्भातील सर्व दावे दिशाभूल करणारे असल्याचे सांगण्यात आले आहे.

राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त आहे. या पार्श्वभूमीवर विविध नावांची चर्चा सुरू झाली असून, त्यात बोरवणकर यांच्या नावालाही प्राधान्य मिळाले. दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या पदासाठी माजी आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी केली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनीही बोरवणकर यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा अधिक रंगली. तथापि, राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसून, सोशल मीडियावर फिरणाऱ्या बातम्या खोट्या असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मीरा बोरवणकर या महाराष्ट्रातील एक अनुभवी व कर्तबगार आयपीएस अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी मुंबई आणि पुणे येथे महत्त्वाच्या पदांवर काम केले असून, त्यांच्या कारकीर्दीत अनेक संवेदनशील प्रकरणे हाताळली आहेत.