हर्षवर्धन सदगीरचा ‘डबल महाराष्ट्र केसरी’ किताब; विजयानंतरच निवृत्तीची घोषणा

पुणे : पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे पार पडलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार रविवारी रात्री उशिरा नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरच्या विजयाने संपला. त्याने सोलापूरच्या ‘बाहुबली’ महेंद्र गायकवाडचा ४-३ अशा अटीतटीच्या लढतीत पराभव करत ‘डबल महाराष्ट्र केसरी’ होण्याचा मान मिळवला.

अटीतटीची लढत

सामन्याच्या सुरुवातीला महेंद्र गायकवाडने आक्रमक खेळ करत हर्षवर्धनला बाहेर ढकलत पहिला गुण मिळवला. मात्र, नियमानुसार खेळ न केल्याने हर्षवर्धनला एक गुण देण्यात आला आणि पहिली फेरी १-१ अशी बरोबरीत राहिली. दुसऱ्या फेरीत ‘अॅक्टिव्हिटी पिरियड’मध्ये महेंद्रला गुण मिळवता आला नाही, त्यामुळे हर्षवर्धनने आघाडी घेतली. त्यानंतर अनुभवाच्या जोरावर त्याने ४ गुणांची आघाडी घेतली. शेवटच्या क्षणी महेंद्रने प्रयत्न करत १ गुण मिळवला, पण अखेर हर्षवर्धनने ४-३ ने विजय मिळवत किताब पटकावला.

विजयानंतर निवृत्तीचा धक्का

कृषीमंत्री दत्तामामा भरणे आणि मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते हर्षवर्धनला चांदीची गदा आणि पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र, विजयाचा आनंद साजरा होत असतानाच त्याने कुस्तीतून निवृत्ती जाहीर करत सर्वांनाच आश्चर्यचकित केले. गदा खांद्यावर घेत अवघ्या काही मिनिटांतच “मी कुस्तीतून निवृत्त होत आहे,” अशी घोषणा करत त्याने आपल्या कारकिर्दीला विराम दिला.या निर्णयामुळे क्रीडाप्रेमींमध्ये आश्चर्य आणि भावनिक वातावरण निर्माण झाले असून त्याच्या भविष्यातील वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.