हत्यांच्या पार्श्वभूमीवर भाजपाचा साधा आनंदोत्सव; विजय साजरा करताना संयम
सोलापूर : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे झालेल्या
बालिकेच्या हत्येची घटना तसेच सोलापूर शहर-जिल्ह्यातील अलीकडील खुनांच्या
पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकांमधील विजयाचा आनंद साधेपणाने
साजरा केला. पश्चिम बंगाल आणि आसाममधील निवडणूक निकालात मिळालेल्या यशानंतर
भाजपाच्या सोलापूर शहर कार्यालयासमोर पक्षाचा ध्वज फडकावून कार्यकर्त्यांनी आनंद
व्यक्त केला. यावेळी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’,
‘जय श्रीराम’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. भाजपाच्या
शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर म्हणाल्या की, पश्चिम बंगालमधील
विजय हा श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्वप्नपूर्तीकडे टाकलेले महत्त्वाचे पाऊल
आहे. देशभरात भाजपाची सत्ता प्रस्थापित करण्याच्या दिशेने पक्षाची वाटचाल सुरू
असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, नसरापूर येथील निष्पाप
बालिकेच्या हत्येची आणि सोलापूरातील सहा हत्यांच्या घटनांची जाणीव ठेवून ढोल-ताशे,
मिठाई यांसारखा जल्लोष न करता केवळ एकमेकांना शुभेच्छा देत साध्या
पद्धतीने आनंद व्यक्त करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितले की, देशातील जनतेचा विश्वास भारतीय जनता पक्षावर असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. निवडणूक निकालातून जनतेचा हा
विश्वास पुन्हा अधोरेखित झाल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, कार्यक्रमादरम्यान नसरापूर येथील मृत बालिका तसेच सोलापूरातील विविध
हत्यांतील मृतांना एक मिनिट मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. या प्रसंगी
भाजपाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.