सोलापुरात बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेवर भाजपाची चिंता; गुन्हेगारांवर कायद्याचा वचक ठेवण्याची मागणी
सोलापूर : शहर व जिल्ह्यात अलीकडील काळात
वाढलेल्या हत्यांच्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडल्याची चिंता व्यक्त करत
भारतीय जनता पक्षाने पोलीस प्रशासनाकडे कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
शहरवासीयांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी गुन्हेगारांवर कायद्याचा वचक निर्माण
होणे आवश्यक असल्याचे निवेदन पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांना देण्यात आले. हे
निवेदन पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी स्वीकारले.
गेल्या काही दिवसांत सोलापुरात सलग घडलेल्या गंभीर गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. अवघ्या तीन दिवसांत सहा हत्यांच्या घटनांनी शहर हादरले असून, माधवनगर परिसरातील भर दिवसा झालेली हत्या तसेच बोरामणी येथील तिहेरी हत्याकांडामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी सांगितले की, “गुन्हेगारांना पोलिसांचा कोणताही धाक उरलेला नाही, हे या घटनांवरून स्पष्ट होते. त्यामुळे सर्व हत्या प्रकरणांचा तपास तातडीने पूर्ण करून खटले जलदगती न्यायालयात चालवावेत आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी.” यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांनीही पोलिसांनी शहरात गस्त वाढवण्याची गरज व्यक्त केली. विशेषतः संवेदनशील भागांमध्ये दिवस-रात्र गस्त वाढवून नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी नमूद केले. या निवेदनावेळी भाजपाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.