सोलापुरातील सुनीलनगरात तरुणाची धारदार शस्त्राने हत्या; प्रेमप्रकरणातून खून झाल्याची चर्चा
सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील
सुनीलनगर येथे शुक्रवारी रात्री एका तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या
करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून
एमआयडीसी पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. मृत तरुणाचे
नाव सिद्धू कैलास कटप (वय २0, रा. सुनीलनगर) असे आहे. तर याप्रकरणी
संतोष पाटील (रा. नितीननगर, सोलापूर) याला पोलिसांनी
चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सुमारे साडेनऊ
वाजण्याच्या सुमारास सिद्धू कटप हा सुनीलनगर ते बनशंकरी हॉटेल मार्गावरून जात
असताना त्याच्यावर एका व्यक्तीने धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात तो
गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि
कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील नागरिकांकडून माहिती घेत
तपासाची सूत्रे हलवली. प्राथमिक चौकशीत संतोष पाटील याने हल्ला केल्याचा संशय
व्यक्त करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम राबवून संशयिताला तातडीने
ताब्यात घेतले. गंभीर जखमी अवस्थेतील सिद्धू कटप याला उपचारासाठी शासकीय
रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला
मृत घोषित केले. स्थानिक स्तरावर मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमप्रकरणातून
हा खून झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र पोलिसांनी अद्याप याबाबत अधिकृत
दुजोरा दिलेला नसून सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. एमआयडीसी पोलीस
या प्रकरणाचा सखोल तपास करत असून खुनामागील नेमके कारण, आरोपी
आणि मृत व्यक्तीतील संबंध तसेच घटनेचा संपूर्ण घटनाक्रम उलगडण्याचे काम सुरू आहे.