बसवेश्वरांच्या शिकवणीचा प्रत्यय; मुक्या प्राण्यांसाठी जलकुंभ वाटप

सोलापूर : महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत वीरशैव व्हिजनतर्फे मुक्या प्राण्यांसाठी जलकुंभांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून प्राण्यांवर प्रेम करणे आणि त्यांच्या पाण्याची जबाबदारी घेणे हीच बसवेश्वरांची खरी शिकवण असल्याचे प्रतिपादन सुरज मुलाणी यांनी केले. ते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही बसव जयंतीनिमित्त १० जलकुंभांचे वाटप करण्यात आले. हे जलकुंभ कै. मुत्यप्पा बिराजदार यांच्या स्मरणार्थ अडत व्यापारी संगमेश्वर बिराजदार यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आले. यावेळी भीम प्रतिष्ठानचे अध्यक्ष वीरेंद्र हिंगमिरे, बसव ब्रिगेडचे अध्यक्ष अमित रोडगे, अडत व्यापारी श्रीकांत धनशेट्टी, वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, उत्सव समिती अध्यक्ष विजयकुमार बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते. शहरातील विविध भागांतील नागरिकांना जलकुंभ देत त्यांच्या माध्यमातून जनावरांसाठी पाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत असून नागरिकांकडूनही त्याचे स्वागत केले जात आहे.