सहा महिन्यांपूर्वी बारमधील बिलावरून वाद; अपमानाचा बदला घेण्यासाठी हरीश गंगावणे यांची हत्या

पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरात ३३ वर्षीय हरीश गंगावणे यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास लाटेआळी परिसरातील आंबेडकर नगर भागात ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, सुमारे सहा महिन्यांपूर्वी बारमधील बिलावरून झालेल्या वादातून आरोपी आणि हरीश गंगावणे यांच्यात वैमनस्य निर्माण झाले होते.

बारमधील बिलावरून झाला होता वाद

हरीश गंगावणे हे शिरूरमध्ये बिअर बार चालवत होते. सुमारे सहा महिन्यांपूर्वी संशयित आरोपी रोहित सोनावणे आणि अनिकेत गव्हाणे हे त्यांच्या बारमध्ये गेले होते. त्यावेळी दारूच्या बिलावरून हरीश आणि दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर मारामारीत झाले होते. या घटनेनंतर आरोपींच्या मनात हरीश यांच्याबद्दल राग असल्याचा पोलिसांचा प्राथमिक तपास आहे.

गणेशोत्सव मंडळाजवळ पुन्हा वाद

गुरुवारी रात्री लाटेआळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील गणेशोत्सव मंडळाजवळ हरीश आणि संशयित आरोपी पुन्हा आमनेसामने आले. जुन्या वादातून त्यांच्यात पुन्हा शिवीगाळ आणि वादावादी झाली. त्यावेळी पोलिसांची गस्त सुरू असल्याने गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करत वाद मिटवला. त्यानंतर हरीश यांनी रोहित सोनावणेच्या मामाकडे त्याच्या वागणुकीबाबत तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे.

दुचाकीवरून जात असताना हल्ला

शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हरीश गंगावणे हे मित्रांसोबत दुचाकीवरून जात असताना हल्लेखोरांनी त्यांना गाठले. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, रोहित सोनावणे, अनिकेत गव्हाणे आणि आदित्य पवार यांनी गावठी कट्ट्यातून हरीश यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात हरीश यांच्या मानेजवळ गोळी लागली, तर दुसरी गोळी हाताला चाटून गेल्याचे सांगण्यात येत आहे.

गोळीबारानंतर हरीश रस्त्यावर कोसळले. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

आरोपींचा शोध सुरू

घटनेनंतर तिन्ही संशयित आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून, आरोपींच्या शोधासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीच्या आधारे पुढील तपास सुरू आहे. हत्येमागे नेमके कोणते कारण होते आणि घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत.