कंटेनरची पाच वाहनांना धडक; एक ठार, ४ जण गंभीर जखमी

पुणे : मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नर्हे येथील भूमकर पुलावर भरधाव कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने समोरून जाणाऱ्या पाच वाहनांना एकापाठोपाठ जोरदार धडक दिली. शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत. कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कंटेनरने पुढील वाहनांना धडक दिल्यानंतर अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही वाहनांमधील प्रवासी वाहनांमध्येच अडकून पडले होते. अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

गॅस कटरच्या सहाय्याने अडकलेल्या प्रवाशांची सुटका

अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी गॅस कटरच्या सहाय्याने वाहनांचे पत्रे कापले. त्यानंतर जखमींना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत

या अपघातामुळे मुंबई-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, कंटेनरचा वेग किती होता आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण कशामुळे सुटले, याचा पोलीस तपास सुरू आहे.