त्याचार प्रकरणी संभाजी ब्रिगेडचा संताप; सोलापूरात आरोपीचा पुतळा जाळून निषेध

सोलापूर : पुणे जिल्ह्यातील नरसापूर येथे चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापूरातील चार हुतात्मा चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी आरोपी भीमा कांबळे याचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध नोंदविण्यात आला. आंदोलनादरम्यान राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. राज्य शासन व गृहविभाग निष्क्रिय असल्याचा आरोप करत, महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र गृहमंत्री पद निर्माण करण्याची मागणी करण्यात आली.

तसेच महिलांवरील अत्याचारांच्या प्रकरणांसाठी जलदगती न्यायालये स्थापन करावीत, राज्य शासनाने तातडीने अधिवेशन बोलावून कठोर कायदे करावेत, तसेच गंभीर गुन्ह्यांमध्ये कठोर शिक्षा देण्याची मागणी आंदोलकांनी केली. या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात ठेवली.