सोलापुरात गर्भवती विवाहितेचा निर्घृण खून; पोटातील बाळाचाही मृत्यू
सोलापूर
शहरात सणासुदीच्या वातावरणात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी सायंकाळी
लष्कर परिसरातील बालप्पा तालीम येथे १९ वर्षीय गर्भवती विवाहितेचा खून करण्यात
आला. सोनी गणेश रामपुरे (वय १९, रा. अलकुंटे चौक, सोलापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेत तिच्या पोटातील बाळाचाही
मृत्यू झाला आहे. सोनी रामपुरे हिचे लग्न वर्षापूर्वी झाले होते आणि ती
डिलिव्हरीसाठी माहेरी आली होती. बापू सुरेश आरगोळ (वय २६, रा.
उत्तर सदर बाजार, सोलापूर) हा या प्रकरणातील संशयित आरोपी
आहे. मयत सोनीच्या आई लक्ष्मी राम म्हेत्रे (वय ५५) यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात
फिर्याद दाखल केली आहे.
प्रेयसीचे लग्न दुसरीकडे
झाल्याचा राग मयत
सोनी आणि आरोपी बापू आरगोळ यांच्यात पूर्वी प्रेमसंबंध होते. मात्र कुटुंबीयांनी
हे लग्न मान्य न केल्याने सोनीचे लग्न दुसरीकडे लावण्यात आले होते. याचाच राग
आरोपीच्या मनात होता.
जाणूनबुजून भांडण काढून हल्ला
रविवारी (१९ एप्रिल) सायंकाळी सोनी आणि तिची आई घराबाहेर बसलेल्या असताना आरोपीने मोठ्याने गाणे लावून गोंधळ घातला. लक्ष्मी म्हेत्रे यांनी गरोदर मुलीचा विचार करून त्याला आवाज कमी करण्यास सांगितले. यावरून आरोपीने संतापून भांडण काढले. यानंतर आरोपीने लक्ष्मी म्हेत्रे यांना धक्का देऊन खाली पाडले आणि नऊ महिन्यांची गर्भवती असलेल्या सोनीवर हल्ला केला. तिचे तोंड दाबून, गळा आवळून तसेच केस धरून भिंतीवर डोके आपटून तिचा खून केला.
दोन जीव गेल्याने हळहळ
या
घटनेत सोनीसोबतच तिच्या पोटातील बाळाचाही मृत्यू झाला आहे. अवघ्या एका वर्षापूर्वी
विवाह झालेल्या तरुणीचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने सोलापुरात हळहळ व्यक्त होत
आहे. सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे