मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयातील धक्कादायक प्रकार उघड; खासदार प्रणिती शिंदेंची अचानक पाहणी, प्रशासनाला फटकार

मंगळवेढा:- ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयाला अचानक भेट देत तेथील आरोग्य सुविधांची पाहणी केली. या भेटीदरम्यान रुग्णालयातील अनेक गंभीर त्रुटी समोर आल्याने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. गावभेटीदरम्यान हाजापूर येथील ग्रामस्थांनी रुग्णालयातील उपचारातील निष्काळजीपणा, कर्मचाऱ्यांची अरेरावी आणि रुग्णांकडे होणारे दुर्लक्ष याबाबत तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत खासदार प्रणिती शिंदे यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता रुग्णालयात भेट दिली. पाहणीदरम्यान प्रसूत महिलांना दिला जाणारा आहार गेल्या दीड महिन्यांपासून बंद असल्याचे समोर आले. संबंधित ठेकेदाराची बिले प्रलंबित असल्यामुळे रुग्णांना जेवणाचा पुरवठा होत नसल्याची माहिती मिळाली. तसेच रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय यंत्रसामग्रीचा अभाव, कर्मचाऱ्यांची कमतरता आणि व्यवस्थापनातील त्रुटीही निदर्शनास आल्या. महिला व पुरुष रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था असणे अपेक्षित असताना प्रसूत महिलांच्या विभागातच पुरुष रुग्णांना दाखल करण्यात आल्याचे आढळले. महिलांसाठी स्वतंत्र शौचालय व स्नानगृहाची सुविधा नसल्यामुळे त्यांच्या खाजगीपणा आणि सन्मानाचा प्रश्न निर्माण झाल्याबद्दल खासदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

रुग्णालय परिसरातील अस्वच्छता, अपुरी सुविधा आणि प्रशासनाच्या उदासीनतेवर संताप व्यक्त करत प्रणिती शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सुधारणा करण्याचे आदेश दिले. त्यांनी सोलापूरचे सिव्हिल सर्जन यांच्याशी थेट संपर्क साधून पाच दिवसांत सर्व त्रुटी दूर करण्याच्या सूचना केल्या. अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही दिला.

यावेळी त्यांनी ओपीडी, औषधसाठा, कर्मचारी उपस्थिती, स्वच्छता व्यवस्था आणि रुग्णसेवेचा आढावा घेतला. रुग्णांचे सीबीसी तपासणीसाठी आवश्यक यंत्र उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर सीएसआर निधीतून आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रशांत साळे, शहराध्यक्ष ॲड. राहुल धुळे, राज्य सचिव ॲड. रवीकिरण कोलेकर, जिल्हा समन्वयक मनोज उलगुलवार, संदीप पवार, कुंडलिक विचुकले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.