उकाड्यात गॅससाठी नागरिकांची धावपळ; एजन्सीबाहेर लांबच लांब रांगा
सोलापूर : शहरात वाढत्या उकाड्याच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस
सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तापमान ४३ अंशांच्या
पुढे गेले असतानाही गॅस एजन्सीबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे
चित्र पाहायला मिळत आहे. बुधवारी सकाळपासूनच महिला, ज्येष्ठ
नागरिक मोठ्या संख्येने एजन्सीसमोर नंबर लावण्यासाठी जमा झाले होते. मात्र,
टोकन किंवा नंबर मिळूनही वेळेत गॅस टाकी मिळत नसल्याची तक्रार
अनेकांनी व्यक्त केली. कडक उन्हात तासन् तास उभे राहावे लागत असल्याने नागरिकांचे
हाल होत असून, विशेषतः महिला आणि वृद्धांना याचा अधिक त्रास
सहन करावा लागत आहे. उष्णतेमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याचीही भीती
व्यक्त केली जात आहे.
नागरिकांच्या प्रमुख मागण्या
- गॅस वितरण व्यवस्था तातडीने सुरळीत करावी
- टोकन पद्धत काटेकोरपणे राबवावी
- एजन्सीबाहेर मंडप व सावलीची व्यवस्था करावी
- पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करावी
नागरिकांनी प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा
उष्णतेमुळे परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते, असा इशाराही दिला
आहे.