सोलापूरकरांना मोठी भेट : ६० वर्षांनंतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला मंजुरी
सोलापूरकरांची तब्बल साठ वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली
असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाने
सोलापूर येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.
मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून
येत्या शैक्षणिक वर्षापासूनच महाविद्यालय सुरू होणार आहे.
या निर्णयामागे आमदार देवेंद्र कोठे यांच्या सातत्यपूर्ण
पाठपुराव्याला यश मिळाले असून पालकमंत्री जयकुमार गोरे यांची खंबीर साथ लाभली.
तसेच उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेला शब्दही पूर्ण केला.
१९६६ साली सोलापूरसाठी मंजूर झालेले अभियांत्रिकी
महाविद्यालय कराड येथे हलवण्यात आले होते. त्यानंतर अनेक दशकांपासून ही मागणी
प्रलंबित होती. आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षणासाठी
परगावी जावे लागत होते, तसेच अनेकांना शिक्षण अर्धवट सोडावे लागत
होते. सोलापूर हे कामगार आणि कष्टकरी वर्गाचे शहर असल्यामुळे तांत्रिक शिक्षणाची
गरज मोठ्या प्रमाणात जाणवत होती. या पार्श्वभूमीवर सोलापुरातच अभियांत्रिकी
शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे
सध्या सुरू असलेले तंत्रशिक्षणाचे अभ्यासक्रम बंद न करता त्याच ठिकाणी नवीन
महाविद्यालय सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
चौकट
: अभ्यासक्रमांना मंजुरी
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पुढील अभ्यासक्रम सुरू
होणार आहेत:
- कृत्रिम बुद्धिमत्ता
व यंत्र शिक्षण
- संगणक विज्ञान व
अभियांत्रिकी
- इलेक्ट्रॉनिक्स व
दूरसंचार
: आमदार देवेंद्र
कोठे
सोलापूर हे कष्टकरी वर्गाचे शहर असून आर्थिक अडचणींमुळे
अनेक विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते. ही गरज
ओळखून पाठपुरावा केला आणि अखेर महाविद्यालयाला मंजुरी मिळाली. हा निर्णय
सोलापूरच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल.