राज्यात कोरोनाचा धोका पुन्हा वाढला; २४ तासांत ९८ नवे रुग्ण

पुणे – राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत 98 नवे रुग्ण आढळले असून त्यात मुंबई आणि पुणे महापालिकेतील प्रत्येकी ३४ रुग्णांचा समावेश आहे. तसेच पिंपरी-चिंचवडमध्ये १० आणि पुणे ग्रामीण भागात ४ रुग्ण सापडले आहेत. आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून नागरिकांनी मास्क वापर, सामाजिक अंतर आणि सॅनिटायझर वापरावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. कोरोना आकडेवारीनुसार चिंतेचा संकेत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, १ जानेवारी ते ५ जून दरम्यान १४,५६५ चाचण्या करण्यात आल्या असून, त्यात १,१६२ रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या राज्यात ५४८ सक्रिय रुग्ण असून, ५९७ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला असून त्यातील बहुतांश रुग्णांना गंभीर सहव्याधी होत्या. मुंबई-पुणे पुन्हा हॉटस्पॉटच्या दिशेने राज्यातील एकूण ५७५ रुग्ण मुंबईत नोंदवले गेले असून, पुण्यातील आकडेही झपाट्याने वाढताना दिसत आहेत. पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागातही रुग्ण वाढ होत असल्याने पुणे जिल्ह्यातील धोका वाढला आहे. लक्षणे सौम्य, पण दक्षतेचा इशारा सध्या आढळणाऱ्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. रुग्णालयात भरतीची गरज कमी भासत आहे. मात्र, नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असं आवाहन आरोग्य विभागाच्या सहसंचालिका डॉ. बबिता कमलापूरकर यांनी केलं आहे.

कोणत्या भागांत किती रुग्ण?

  • मुंबई महापालिका – ३४
  • पुणे महापालिका – ३४
  • पिंपरी-चिंचवड महापालिका – १०
  • पुणे ग्रामीण – ४
  • ठाणे – ४
  • सांगली व छत्रपती संभाजीनगर – प्रत्येकी ३
  • कल्याण – २
  • वसई-विरार, सातारा, नागपूर, छत्रपती संभाजीनगर (ग्रामीण) – प्रत्येकी १