पोटनिवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय; सरकारच्या कामगिरीला मतदारांची पसंती

कर्नाटकातील बागलकोट आणि दावणगेरे दक्षिण विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांत काँग्रेस उमेदवारांनी भव्य विजय मिळवला आहे. या विजयाला राज्य सरकारच्या कामगिरीची पावती असल्याचे वस्त्रोद्योग, ऊस विकास, साखर तसेच कृषी बाजार मंत्री शिवानंद पाटील यांनी सांगितले. त्यांच्या मते, विरोधकांकडून भडकाऊ भाषणांद्वारे आणि अपप्रचाराद्वारे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न झाला. मात्र मतदारांनी विकास आणि समाजातील शांतता यांना प्राधान्य देत काँग्रेसचे उमेदवार उमेश मेटी आणि समर्थ शमनूर यांना विजयी केले. प्रचारादरम्यान राज्य सरकारवर हलक्या पातळीवर टीका करण्यात आली, तसेच मतविभाजनाचे प्रयत्नही झाले. तरीही मतदारांनी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून काँग्रेसच्या बाजूने कौल दिला. या निकालामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे नेतृत्व अधिक बळकट झाल्याचे त्यांनी नमूद केले. उमेश मेटी आणि समर्थ शमनूर यांचे अभिनंदन करताना त्यांनी नव्याने निवडून आलेल्या आमदारांनी आपल्या मतदारसंघांचा सर्वांगीण विकास साधावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
विजयपूर येथील एका आमदाराने बागलकोटमध्ये माझ्या आणि माझ्या मुलीविरुद्ध अपप्रचार केला. त्यामुळे मतदारांनी भाजपविरोधात कौल दिला आणि काँग्रेसला मोठा विजय मिळाला, अशी टीका मंत्री शिवानंद पाटील यांनी केली. तसेच संबंधित आमदार ज्या मतदारसंघांत प्रचारासाठी गेले, तेथे भाजपचा पराभव होऊन काँग्रेस विजयी झाल्याचा टोला त्यांनी लगावला.