सोलापुरात SIR प्रक्रिया पारदर्शकपणे राबवा; खासदार प्रणिती शिंदे यांची प्रशासनाकडे मागणी

महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्यात निवडणूक आयोगामार्फत विशेष सखोल पुनर्रिक्षण (SIR) प्रक्रिया सुरू असून मतदार याद्या अद्ययावत करणे, नवीन नावे समाविष्ट करणे, चुकीची नावे दुरुस्त करणे तसेच मृत किंवा स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्याचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांची भेट घेऊन SIR प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी सोलापूर पूर्व जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सातलिंग शटगार, शहर काँग्रेस अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, सोलापूर पश्चिम जिल्हाध्यक्ष संदीप साठे यांच्यासह काँग्रेसचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, SIR प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने राबवली गेली पाहिजे. बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) यांनी कोणत्याही राजकीय दबावाखाली न येता प्रत्येक मतदाराच्या घरोघरी जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच बूथ लेव्हल एजंट (BLA) यांनाही या प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे, जेणेकरून मतदार याद्यांबाबत कोणताही संशय निर्माण होणार नाही. त्यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, प्रत्येक मतदाराने एन्युमरेशन फॉर्म काळजीपूर्वक भरून आवश्यक कागदपत्रांसह वेळेत जमा करावा. फॉर्ममध्ये संपूर्ण माहिती, फोटो आणि सही अचूक असणे आवश्यक असून फॉर्म न भरल्यास मतदार यादीतून नाव वगळले जाण्याची शक्यता आहे.

यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी काही राज्यांतील निवडणुकांमध्ये SIR प्रक्रियेच्या माध्यमातून विरोधकांच्या मतदारांची नावे कमी करण्यात आल्याच्या आरोपांबाबत चिंता व्यक्त केली. बंगाल आणि बिहारमध्ये अशा तक्रारी समोर आल्याचा उल्लेख करत त्यांनी सोलापुरात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी काँग्रेस पक्ष सतर्क असल्याचे सांगितले. तसेच मतदारांची नावे कमी करण्याची प्रक्रिया पारदर्शक असावी, कमी करण्यात आलेल्या नावांची यादी उपलब्ध करून द्यावी आणि BLO अधिकाऱ्यांची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी कोणत्याही पात्र मतदाराचे नाव अन्यायकारकरीत्या वगळले जाणार नाही याची प्रशासन दक्षता घेईल, असे स्पष्ट केले.