‘श्यामकुमार बर्वे माझ्या मोठ्या भावासारखे’; चापटकांडावर खासदार प्रतिभा धानोरकरांचा खुलासा
चापटकांडावर प्रतिभा धानोरकर यांचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली : काँग्रेसच्या १ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे
झालेल्या ‘व्होट बचाव, देश बचाव’ रॅलीदरम्यान खासदारांच्या
बसमधील प्रवासाचा एक व्हिडिओ समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
या व्हिडिओमध्ये रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे यांनी चंद्रपूरच्या खासदार
प्रतिभा धानोरकर यांच्या गालावर चापट मारल्याचा दावा केला जात आहे. या कथित
प्रकारावरून काँग्रेसमधील काही पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्याची
माहिती आहे.
मात्र, प्रतिभा धानोरकर यांनी स्वतः याबाबत
स्पष्टीकरण देत श्यामकुमार बर्वे यांनी आपल्यासोबत कोणतेही चुकीचे कृत्य केले
नसल्याचे स्पष्ट केले आहे.
‘श्यामकुमार बर्वे माझ्या मोठ्या
भावासारखे’
या प्रकरणावर बोलताना प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, “आम्ही सगळे खासदार भावा-बहिणीसारखे राहतो. बातमी करण्यासारखा हा विषय
नव्हता. श्यामकुमार बर्वे हे मला मोठ्या भावासारखे आहेत. अशा पद्धतीने एखाद्या
महिला खासदाराची बदनामी करणे योग्य नाही.” पुढे त्यांनी सांगितले की, बर्वे यांनी खरोखरच आपल्याला चापट मारली असती, तर
आपण स्वतः काँग्रेस नेतृत्वाकडे तक्रार केली असती. या प्रकरणी वरिष्ठांकडे तक्रार
करणारे आमचे हितचिंतक किंवा राजकीय विरोधक असू शकतात, असा
संशयही त्यांनी व्यक्त केला.
व्हायरल व्हिडिओमध्ये नेमके काय?
१ नोव्हेंबर रोजी दिल्लीमध्ये आयोजित ‘व्होट बचाव, देश बचाव’ रॅलीत सहभागी होण्यासाठी काँग्रेसचे खासदार बसमधून एकत्र प्रवास
करत होते. याच प्रवासादरम्यानचा असल्याचा दावा केला जाणारा व्हिडिओ सोशल मीडियावर
व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे उभे असल्याचे,
तर त्यांच्या शेजारी खासदार प्रतिभा धानोरकर आणि मुंबई काँग्रेसच्या
नेत्या वर्षा गायकवाड बसलेल्या दिसतात. तिघांमध्ये संभाषण सुरू असताना बर्वे यांनी
धानोरकर यांच्या गालाला हात लावल्याचे दृश्य दिसत असल्याचा दावा केला जात आहे. या
दृश्यावरून चापट मारल्याची चर्चा सुरू झाली.
काँग्रेसच्या वरिष्ठांकडे ई-मेलद्वारे तक्रार
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसमधील काही
पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे. या कथित प्रकाराची गंभीर दखल
घेऊन चौकशी करावी, संबंधित खासदाराला जाब विचारावा आणि
योग्य ती शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी करणारा ई-मेल
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील
विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना पाठवण्यात
आल्याची माहिती आहे. मात्र, प्रतिभा धानोरकर यांनी या
संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण देत बर्वे यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. त्यामुळे
व्हायरल व्हिडिओ आणि त्यावरून सुरू झालेल्या राजकीय चर्चेला आता त्यांच्या
खुलाशामुळे नवे वळण मिळाले आहे.