सातारा जिल्हा बँकेच्या विजयी मिरवणुकीत राडा; पंचायत समिती सदस्याला मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा
विजयी मिरवणुकीत फटाक्यांवरून वाद
सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या
संचालकपदाच्या निवडणुकीत ज्ञानदेव किसन रांजणे विजयी झाल्यानंतर वरोशी (ता. जावळी)
येथे काढण्यात आलेल्या विजयी मिरवणुकीदरम्यान वाद निर्माण झाला. फटाके फोडण्यास
विरोध केल्याच्या कारणावरून शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य अतिश कदम यांना शिवीगाळ
करून मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरात लहान बाळ असल्याने फटाके न फोडण्याची विनंती
अतिश संतोष कदम (वय २६, रा. वरोशी, ता.
जावळी) यांनी याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या
माहितीनुसार, ३ नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास
जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवार ज्ञानदेव किसन
रांजणे यांच्या समर्थनार्थ वरोशी गावातून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत
डीजे आणि फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. दरम्यान, काही फटाके
कदम यांच्या घराच्या दिशेने गेल्याने त्यांची आई संगीता कदम यांनी घरात तीन
महिन्यांची लहान मुलगी असल्याचे सांगत फटाके न फोडण्याची विनंती केली. यावेळी माजी
उपसभापती निर्मला कासुर्डे यांनी संगीता कदम यांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.
तसेच अक्षय नामदेव करंजेकर आणि प्रदीप मोहन कासुर्डे यांनी अतिश कदम यांना बाहेर
भेटल्यावर मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
पोलीस ठाण्याबाहेर अतिश कदम यांना मारहाण
या प्रकारानंतर अतिश कदम आणि त्यांचे सहकारी एकनाथ ओंबळे
तक्रार देण्यासाठी मेढा पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी अक्षय करंजेकर तेथे आला
आणि अतिश कदम यांच्याशी बोलायचे असल्याचे सांगून त्यांना पोलीस ठाण्याबाहेर घेऊन
गेला. काही वेळाने प्रदीप मोहन कासुर्डे, गणेश विष्णू शिंदे आणि अक्षय नामदेव
करंजेकर हे तेथे आले. त्यांनी अतिश कदम यांच्या डोळ्याला आणि नाकाला गंभीर दुखापत
होईल अशा प्रकारे मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यानंतर
संबंधित आरोपी गर्दीचा फायदा घेऊन तेथून निघून गेले.
रुग्णालयात उपचार; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
मारहाणीनंतर मेढा पोलीस ठाण्यातील अंमलदारांनी अतिश कदम
यांना वैद्यकीय तपासणीसाठी पत्र दिले. त्यानंतर एकनाथ ओंबळे यांनी त्यांना मेढा
ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणी प्रदीप मोहन कासुर्डे, गणेश विष्णू शिंदे आणि अक्षय नामदेव करंजेकर या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील
तपास सुरू आहे. दरम्यान, ही घटना मेढा पोलीस ठाण्याच्या
आवारात घडल्याने संबंधित ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी पंचायत समिती सदस्य अतिश कदम यांनी केली आहे. या घटनेमुळे
जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या विजयी मिरवणुकीतील जल्लोषाला गालबोट लागले आहे.