उतारवयात जुळले प्रेम; वादातून प्रियकराची हत्या केल्याचा आरोप, दीड महिन्यांनी गूढ उकलले
पंढरपूर : अर्धवट जळालेल्या मृतदेहामुळे खळबळ
पंढरपूर परिसरात शेतात अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने
खळबळ उडाली होती. 2 ऑगस्ट रोजी काही गावकऱ्यांना हा
मृतदेह आढळल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत
पंचनामा केला. मृतदेह मोठ्या प्रमाणात जळालेला असल्याने त्याची ओळख पटविणे कठीण
झाले होते. त्यामुळे फॉरेन्सिक पथकाला पाचारण करून मृतदेह डीएनए तपासणीसाठी
पाठविण्यात आला.
डीएनए चाचणीत मृत व्यक्तीची ओळख पटली
तपासादरम्यान अंबादास खांडेकर (70) हे
बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या दोन
मुलींचे डीएनए नमुने घेतले. डीएनए चाचणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृतदेह आणि
अंबादास खांडेकर यांच्या मुलींचे नमुने जुळल्याचे समोर आले. त्यामुळे अर्धवट
जळालेला मृतदेह अंबादास खांडेकर यांचा असल्याचे स्पष्ट झाले.
प्रेमसंबंधातून वाद झाल्याचा तपासातील दावा
पोलिसांच्या माहितीनुसार, अंबादास खांडेकर आणि मंगल होनमाने (70)
यांच्यात गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. 27 जुलै रोजी दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला. या वादातून मंगल होनमाने
हिने अंबादास यांची शेतात हत्या केल्याचा पोलिसांचा आरोप आहे. त्यानंतर मृतदेह
जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचेही तपासात समोर आल्याचे पोलिसांनी
सांगितले.
डीएनए रिपोर्टनंतर तपासाला वेग
मृतदेहाची ओळख पटताच पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली. दीड महिन्याच्या तपासातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मंगल होनमाने हिचा शोध घेतला. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीदरम्यान प्रेमसंबंधातील वादातून अंबादास यांची हत्या केल्याची कबुली तिने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.