शहरात मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 7 सराईत गुन्हेगारांना अटक; 10.29 लाखांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर, दि. - शहर गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत सतर्कता दाखवत शहरात मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 7 सराईत गुन्हेगारांच्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. या धाडसी कारवाईत पोलिसांनी पिस्तूल, जिवंत काडतुसांसह घातक शस्त्रे आणि वाहने असा एकूण 10 लाख 29 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रविवारी रात्री सहायक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिव व त्यांचे पथक एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना, पोलीस शिपाई अमोल यादव आणि सहायक निरीक्षक चंदनशिव यांना माहिती मिळाली. शहरातील मुळेगाव रोडवरील अमर ज्योती नगर (नरसिंग नगर शेजारी) येथे काही इसम घातक शस्त्रांसह, एका काळ्या रंगाच्या चारचाकी आणि दुचाकीसह जमा झाले असून ते शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत. बातमीचे गांभीर्य ओळखून सहायक पोलीस आयुक्त दिलीप पवार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनशिव, सहायक पोलीस निरीक्षक नीलेश सोनवणे, फौजदार विजय बनसुडे, मनोज मोरे आणि पथकाने सापळा रचला. संशयास्पद स्थितीत असलेल्या सर्व सातजणांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले. मनदीपसिंग दयासिंग संधू (वय 43), दिलीपसिंग हरीसिंग पवार खालसा (वय 34), बलप्रीतसिंग सतनामसिंग खैरा (वय 25, तिघे रा. नांदेड), अंकुर रामकुमार प्रताप सिंह (वय 28, रा. पाटणा, बिहार), लक्ष्मण नामदेव जगताप (वय 35, रा. छत्रपती संभाजीनगर), सुखदेवसिंग बलविंदरसिंग गिल (वय 42, रा. जि. तरनतारन, पंजाब) व राजेश कण्णीराम राठोड (वय 44, रा. अमर ज्योतीनगर, सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

यावेळी आरोपी अंकुर सिंह याच्या अंगझडतीत 1 देशी बनावटीचे पिस्तूल आणि 5 जिवंत काडतुसे मिळून आली. तसेच महिंद्रा एक्सयूव्ही 500 (एमएच 12 एचबी 7700) आणि यामाहा मोटारसायकल (टीजी 07 एजे 6467) या वाहनांची झडती घेतली असता त्यातून 2 तलवारी, 3 खंजीर, 2 कटावणी, 1 छन्नी, 1 लांब दोरखंड, 3 जोड हँडग्लोव्हज, 2 नंबर प्लेट, 1 कलर स्प्रे बॉटल, 7 मोबाइल फोन असा ऐवज जप्त करण्यात आला. आरोपींच्या कडक चौकशीदरम्यान आरोपी राजेश राठोड याने शहरात दरोडा टाकण्यासाठीच दिवसभरात ही सर्व हत्यारे गोळा केल्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलीस शिपाई अमोल यादव यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपींवर यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, घरफोडी, जबरदस्तीने चोरी आणि हत्यार कायदा यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.  पत्रकार परिषदेस पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त दिलीप पवार उपस्थित होते.

सातजणांची कारागृहात झाली ओळख

यातील सातही आरोपी हे नांदेड, बिहार, पंजाब, छत्रपती संभाजीनगर व सोलापूर येथे राहणारे आहेत. हे सर्वजण अटकेनंतर कारागृहात गेल्यानंतर त्यांची तेथे ओळख झाली. त्या ओळखीनंतर त्यांनी कारागृहातून बाहेर आल्यानंतर एकत्र येऊन मोठ्या दरोड्याचा घाट घातला होता. परंतु शहर पोलिसांनी त्यांना गजाआड करुन त्यांच्या योजनेवर पाणी फेरले आहे.

दरोड्यापूर्वी झोपले अन जाळ्यात अडकले

सर्व आरोपी हे रविवारी सकाळी सोलापुरात आले होते. त्यांनी शहरात दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य गोळा करुन रात्री दरोड्याची तयारी केली होती. तत्पूर्वी ते अमर ज्योतीनगरातील घरात झोपले असताना पोलिसांनी मोठ्या फौजफाट्यासह जाऊन सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या.