ज्येष्ठ अभिनेते रमाकांत दयामा यांचे निधन; अभिनेत्री शुभांगी लाटकर यांनी वाहिली श्रद्धांजली

लोकप्रिय टीव्ही मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते रमाकांत दयामा यांचे आज (२६ मे) निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती अभिनेत्री शुभांगी लाटकर यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत दिली.

शुभांगी लाटकर यांनी रमाकांत दयामा यांच्यासोबतचा एक जुना व्हिडिओ शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. या व्हिडिओमध्ये ते गाणे म्हणताना आणि इतर कलाकारांसोबत आनंदाने नृत्य करताना दिसत आहेत. आपल्या पोस्टमध्ये शुभांगी लाटकर यांनी लिहिले की, “आज आपण एक अत्यंत सुंदर मनाचा माणूस गमावला आहे. रमाकांत दयामा हे माझ्यासाठी केवळ जिवलग मित्र नव्हते, तर प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते. ते उत्साही, प्रेमळ आणि आयुष्याचा आनंद घेणारे कलाकार होते.” त्यांनी पुढे म्हटले की, रमाकांतजी उत्कृष्ट अभिनेते, सुरेल गायक आणि उत्तम मार्गदर्शक होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती होती, मात्र ते लवकर बरे होतील अशी आशा कायम होती. भविष्यात त्यांच्यासोबत हिंदी नाटक आणि कवितांचे सादरीकरण करण्याचे अनेक बेत आखले होते, पण ते आता अपूर्णच राहिले असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. रमाकांत दयामा यांच्या निधनाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यांच्या निधनानंतर मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी तसेच चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.