सोलापुरातील सामूहिक अत्याचार प्रकरणाला धक्कादायक वळण; तरुणीची खोटी तक्रार उघड
सोलापूर : शहरातील विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत
घडल्याचा दावा करण्यात आलेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले
आहे. या प्रकरणातील तक्रार ही बनाव असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले असून
संबंधित तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पोलीस आयुक्तांनी
पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. तपासात समोर आले की, तरुणीने आपल्या प्रियकराला जुन्या गुन्ह्यातून वाचवण्यासाठी आणि
साक्षीदारांवर दबाव आणण्यासाठी हा खोटा बनाव रचला होता.
डायल ११२ वरून तक्रार १८ मार्च २०२६ रोजी रात्री
साडेआठच्या सुमारास पंचवीस वर्षीय तरुणीने ११२ क्रमांकावर फोन करून चार जणांनी
आपल्यावर सामूहिक अत्याचार केल्याची माहिती दिली होती. या तक्रारीचे गांभीर्य
ओळखून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चार संशयितांना ताब्यात घेतले होते.
तपासात उघड झाल्या विसंगती तपासादरम्यान पोलिसांनी
सीसीटीव्ही चित्रफिती, मोबाईल कॉल तपशील आणि वैद्यकीय अहवालांची
पडताळणी केली. तसेच तरुणीच्या मैत्रिणी आणि बहिणीची चौकशी केली असता, कथित घटना घडली नसल्याचे स्पष्ट झाले. अखेर पोलिसांनी कसून चौकशी करताच
तरुणीने स्वतःच हा प्रकार बनाव असल्याची कबुली दिली. दोघांवर गुन्हा दाखल या
प्रकरणात खोटी फिर्याद दिल्याप्रकरणी संबंधित तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला
आहे. तसेच तिच्या प्रियकराविरुद्धही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे,
ज्या विजापूर नाका पोलीस ठाण्यात तिने तक्रार दिली होती, त्याच ठाण्यात आता ती आरोपी ठरली आहे. या घटनेमुळे पोलीस यंत्रणेचा वेळ
आणि साधनसंपत्ती वाया गेल्याचे स्पष्ट झाले असून, खोट्या
तक्रारींबाबत कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.