HSRP साठी नोंदणी केली, पण नंबरप्लेटचा पत्ता नाही; वाहनचालकांची वाढली चिंता
राज्यात उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP) बसविणे बंधनकारक करण्यात आले असले तरी पुणे जिल्ह्यात अनेक वाहनचालकांना
नोंदणी करूनही नंबरप्लेट मिळालेली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वाहनधारकांना
प्रतीक्षा करावी लागत असून कारवाईच्या शक्यतेमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. माहितीनुसार,
पुण्यात २५ लाखांहून अधिक वाहनांना HSRP बसविणे
आवश्यक आहे. आतापर्यंत सुमारे ११ लाख ३६ हजार वाहनचालकांनी नोंदणी केली असून
त्यापैकी सुमारे ९ लाख ३५ हजार वाहनांवर नंबरप्लेट बसविण्यात आली आहे. मात्र,
लाखो वाहनधारक अजूनही प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे. परिवहन
विभागाने HSRP बसविण्यासाठी यापूर्वी अनेक वेळा मुदतवाढ दिली
असून सध्या ३० जूनपर्यंतची अंतिम मुदत लागू आहे. मुदतीनंतर नंबरप्लेट नसलेल्या
वाहनांवर एक हजार रुपयांचा दंड आकारला जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात
आली आहे. दरम्यान, काही वाहनचालकांनी नोंदणी केल्यानंतर
निश्चित वेळेत फिटमेंट सेंटरवर हजेरी न लावल्यामुळेही प्रलंबित प्रकरणांची संख्या
वाढत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे वाहनधारकांनी मिळालेल्या वेळेनुसार
नंबरप्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. HSRP
संदर्भातील वाढती गर्दी आणि मर्यादित क्षमतेमुळे एका महिन्यात
उर्वरित लाखो वाहनांवर नंबरप्लेट बसविण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले
आहे.