खरात प्रकरणाचा पर्दाफाश ऑफिस बॉयमुळे; सीसीटीव्ही फुटेजमधून धक्कादायक खुलासे
नाशिक : महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे चर्चेत असलेल्या
अशोक खरात प्रकरणाचा पर्दाफाश त्याच्याच कार्यालयातील कर्मचाऱ्यामुळे झाल्याचे
तपासात उघड झाले आहे. या प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे.
सध्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकाकडून
सुरू असून, डिजिटल पुरावे आणि सीसीटीव्ही
चित्रफितींच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली जात आहे.
तपासानुसार, अशोक खरात नाशिकमधील कॅनडा कॉर्नर
परिसरात ‘प्रॉपर्टीज अँड डेव्हलपर्स’ नावाचे कार्यालय चालवत होता. याच ठिकाणी अनेक
महिलांना बोलावून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
सीसीटीव्ही फुटेजमुळे उघडकीस आले प्रकरण
खरातच्या कार्यालयात काम करणारा नीरज जाधव या
कर्मचाऱ्याने त्याच्या नकळत सीसीटीव्ही फुटेज स्वतःकडे घेतले. या फुटेजमधील
व्हिडिओ क्लिप्समुळेच संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.
तपासात आतापर्यंत महिलांशी संबंधित तब्बल ५६ आक्षेपार्ह
क्लिप्स समोर आल्याची माहिती आहे.
खंडणीचा प्रयत्न आणि ब्लॅकमेलिंग
डिसेंबर २०२५ मध्ये नीरज जाधवने या फुटेजच्या आधारे
खरातकडे तब्बल ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. मात्र, खरातने पैसे देण्यास नकार देत वावी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
यानंतर नीरजने पीडित महिलांकडे मोर्चा वळवून त्यांना
धमकावण्यास सुरुवात केली. शिर्डीतील एका विवाहित महिलेचे मॉर्फ फोटो आणि व्हिडिओ
तिला पाठवून दबाव टाकण्यात आला.
त्यानंतर सिडको परिसरातील आणखी एका विवाहितेचा व्हिडिओ
तिच्या नातेवाईकाला पाठवण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली.
पीडितेच्या तक्रारीनंतर प्रकरण उघड
या घटनेनंतर संबंधित महिलेने धाडस दाखवत सरकारवाडा पोलीस
ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर अशोक खरातचा खरा चेहरा समोर आला आणि संपूर्ण
प्रकरण उघडकीस आले.
फेब्रुवारी २०२६ मध्ये खरातविरोधात गुन्हा दाखल करण्यात
आला असून, तपासादरम्यान ब्लॅकमेलिंग, खंडणी आणि महिलांच्या
छळाचे गंभीर आरोप समोर आले आहेत.
विशेष तपास पथकाची चौकशी
या प्रकरणाचे धागेदोरे काही राजकीय व्यक्ती आणि इतर
प्रभावशाली घटकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य पोलिसांनी विशेष
तपास पथक स्थापन केले आहे.
या पथकाचे नेतृत्व तेजस्वी सातपुते करत असून त्यांनी
नाशिकमध्ये दाखल होऊन तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत.
पुढील तपास सुरू
नीरज जाधवला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सर्व
सीसीटीव्ही फुटेज आणि डिजिटल पुराव्यांची तपासणी सुरू आहे. तसेच आणखी पीडित
महिलांचा शोध, आर्थिक व्यवहार आणि संभाव्य नेटवर्कची
चौकशी केली जात आहे.
या प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली असून पुढील
तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.