सोलापुरात काँग्रेसचा ‘जनआक्रोश रस्ता रोको’; प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महामार्ग ठप्प
सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील मार्केट यार्ड परिसरात
काँग्रेसच्या वतीने खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भव्य ‘जनआक्रोश
रस्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. विविध प्रश्नांवर सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी
आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या
संख्येने सहभागी झाले होते.
खासदार प्रणिती शिंदे यांनी कार्यकर्त्यांसह महामार्गावर ठिय्या
आंदोलन करत साखळी पद्धतीने रास्ता रोको केला. या आंदोलनामुळे सोलापूर-हैदराबाद
महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. अनेक वाहनांच्या रांगा
लागल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आंदोलनादरम्यान
काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
काही शेतकऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून आपल्या संतापाची भावना व्यक्त
केली. शेतीमालाला योग्य भाव, वाढती महागाई, शेतकरी प्रश्न
आणि प्रशासनाच्या धोरणांविरोधात आंदोलनकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. खासदार
प्रणिती शिंदे यांनी यावेळी सरकारवर टीका करत शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या
प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. जनतेच्या प्रश्नांवर सरकारने
तातडीने निर्णय घ्यावेत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात
येईल, असा इशाराही त्यांनी दिला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर
पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस
प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली.